आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांना महाविद्यालय स्तरावर उत्स्फूर्त प्रतिसाद
मुंबई: राज्याच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत पुढील ३ महिन्यात अनेक उपक्रम हाती घेण्यात आले असून, विविध महाविद्यालयांकडून आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. राज्यातील १००० महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रांची स्थापना करण्यात येणार असल्याचे कौशल्य विकास विभागाकडून सांगण्यात आले होते, परंतु आत्तापर्यंत १९५८ महाविद्यालयांनी याकरिता अर्ज दाखल केले आहेत. या पार्श्वभूमीवर येणाऱ्या काळामध्ये अधिक महाविद्यालयांना या उपक्रमात सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगितले आहे. आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रावर पुढील महिन्यापासून प्रशिक्षण कार्यक्रम देखील सुरु होणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, २०२० मध्ये व्यावसायिक शिक्षणाला महत्व देण्यात आलेले आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीला सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी तसेच, युवक-युवतींना महाविद्यालयांमध्येच कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी "आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र" ही नाविन्यपूर्ण योजना सुरु करण्यात आली आहे. राज्यातील १००० नामांकित महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात येत आहेत. याकरिता अर्ज देखील मागवण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात १००० पेक्षा अधिक महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे अर्ज दाखल केले आहेत. ही बाब सकारात्मक असून, याकरिता विभागाने देखील पुढाकार घेतला आहे.
Comments
Post a Comment