श्री क्षेत्र पंढरपूर शाखेत आषाढी एकादशी सोहळा साजरा
कोपरगाव प्रतिनिधी
आषाढी एकादशीचे पर्वावर वारीसाठी आलेल्या वारकरी भक्तांना श्री क्षेत्र पंढरपूर शाखे व्दारा श्री गजानन महाराज मठामध्ये नवमी, दशमी, एकादशी व बारस या कालावधीत २ लाख ५० हजारावर भक्तांना श्री महाप्रसाद वितरीत करण्यात आला, तसेच वारी निमित्त आलेल्या ४९ दिंड्यांपैकी नियमाची पूर्तता केलेल्या ४६ भजनी दिंड्यांना भजनी साहित्यासह श्री संत वाङमयाचे वितरण करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी धर्मार्थ अॅलोपॅथीक फिरते रूग्णालयाचे माध्यमातून ३० हजार भाविकांनी आरोग्य सेवेचा लाभ घेतला आहे. आतापर्यंत श्री संस्थेव्दारा शेगांव, श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर या तिर्थक्षेत्री आलेल्या आलेल्या २० हजार २० गावांना भजनी साहित्य व श्री संत वाङ्मयाचे वितरण करण्यात आले आहे. अशा रितीने श्री पंढरीनाथाचे व श्री कृपेने श्री संस्थानकडून वारकऱ्यांची सेवा घडून आली आहे.
श्रींचे पालखीचे आषाढ शु. १५ रविवार दि. २१ जुलै, २०२४ रोजी सकाळी काला झाल्यावर श्री क्षेत्र पंढरपूर येथून शेगांव करीता प्रस्थान होईल, श्रींची पालखी करकंब, भगवान बार्शी, बीड, गेवराई, जालना, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर, जानेफळ, खामगांव वा मार्गाने सुमारे ५५० कि.मी. चा प्रवास करून श्रावण शु. ७ रविवार दि. ११ ऑगस्ट, २०२४ रोजी शेगांव येथे आगमन होईल.
श्री शाखेत श्री प्रगटदिन, श्री रामनवमी व श्री पुण्यतिथी उत्सव नित्यनेमाने साजरे करण्यात येतात. त्याचबरोबर आषाढीवारी व कार्तिक वारीचे प्रसंगी नवमी, दशमी, एकादशी व बारस असे चार दिवस भाविकांना श्री महाप्रसादाचे वितरण करण्यात येते. तसेच चातुर्मासात वारकरी परंपरेनूसार चार महिने प्रवचन, भजन, कीर्तन आदिंचे आयोजन केले जात असून चातुर्मासात ५०० वारकऱ्यांना दररोज माधुकरीचे वितरण देखील करण्यात येते.
आषाढी व कार्तिक वारीचे वेळेस महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या व नियमाची पूर्तता केलेल्या भजनी दिंडांना १० टाळजोड, १ विणा, १ मृदंग, १ हातोडी असे भजनी साहित्य व श्री ज्ञानेश्वरी, श्री तुकाराम महाराज गाथा व श्री एकनाथी भागवत या संत वाङ्मयाचे वितरण करण्यात येते.
Comments
Post a Comment