जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड
जय हिंद फाउंडेशनची आर्मी पब्लिक स्कूलमध्ये दोनशे झाडांची लागवड
विद्यार्थ्यांनी स्विकारली संवर्धनाची जबाबदारी
वृक्षांनी शाळेचा परिसर हिरवाईने फुलून विद्यार्थ्यांना सावली मिळणार -नूतन मिश्रा
अहमदनगर - जय हिंद फाउंडेशनच्या वतीने शहरातील आर्मी पब्लिक स्कूल येथे दोनशे झाडांची लागवड केली. पावसाळा सुरु झाला असताना फाऊंडेशनच्या वतीने माजी सैनिकांनी जिल्हाभर वृक्ष लागवडीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या पार्श्वभूमीवर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. तर लावलेल्या झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी शालेय विद्यार्थ्यांनी स्विकारली आहे.
आर्मी पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नूतन मिश्रा, निवृत्त कर्नल सर्जेराव नागरे, लेफ्टनंट कर्नल सोमेश्वर गायकवाड यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाचा प्रारंभ झाला. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, रोहिदास पालवे, एकनाथ माने, सतीष पालवे, बाजीराव गोपाळघरे, दिनानाथ तांदळे, विनायक मोराळे, यश फाउंडेशनचे संजय डोंगरे, नवनाथ वारे, कौडेश्वर सैनिक फाउंडेशनचे अशोक मुठे, दादाभाऊ बोरकर, गणेश भांबे, त्रिदल संघटनेचे बाळासाहेब आंधळे, हरिभाऊ चितळे, बिभीषण पवार, थ्री शक्ती माजी सैनिक संघटना टाकळी खादगावचे बशीर शेख, विठ्ठल नरवडे, सोपान जाधव, बापू गायकवाड, भगवान बाबा फाऊंडेशनचे कुशल घुले आदींसह शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.
आर्मी पब्लिक स्कूलची नवीन इमारत उभी राहिली असून, त्या भोवती विविध प्रकारचे 200 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षांनी शाळेचा परिसर हिरवाईने फुलणार आहे. तर विद्यार्थ्यांना भविष्यात मोठ्या प्रमाणात सावली मिळणार असल्याची भावना प्राचार्या नूतन मिश्रा यांनी व्यक्त करुन, जय हिंदच्या वृक्षरोपण चळवळीचे कौतुक केले.
कर्नल सर्जेराव नागरे म्हणाले की, माजी सैनिकांच्या वृक्षरोपण व संवर्धन चळवळीने पर्यावरणाचे प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक माजी सैनिकांसह नागरिकांनी या चळवळीत उतरुन जिल्हा हरित व सुंदर करण्यास योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले.
कर्नल सोमेश्वर गायकवाड म्हणाले की, जय हिंदची पर्यावरणासाठी सुरु असलेली वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ भविष्यात राज्याला प्रेरणा देणारी ठरणार आहे. झाडांमुळेच ऑक्सिजन, फळ, फुले, औषधे, सौंदर्यप्रसाधने बनतात. वृक्षही मानवाची गरज असून, या दृष्टीने प्रत्येकाने झाडे लावून त्याचे संवर्धन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. विजय कापसे यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment