खून व हल्ल्याशिवाय आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज नाही

 खून व हल्ल्याशिवाय आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज नाही

नगर जिल्ह्यात सारेच कसे शांत शांत, चर्चेचे झाले कारण

अहमदनगर : दर महिना-दीड महिन्याला पडणारा एक खून... दर आठ-पंधरा दिवसांनी टोळक्यांमध्ये होणारे एकमेकांवरील जीवघेणे हल्ले... पुरेसा पडत नसलेला पाऊस किंवा पाऊस होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज एवढे दोन-तीन विषय सोडले तर नगर शहर व जिल्ह्यात राज्य हादरवून टाकेल अशी कोणतीही ब्रेकिंग न्यूज मागील दीड-दोन महिन्यात नाही. टीव्हीवर जेव्हा पावसाने, दरड कोसळल्याने, वाहनांच्या तोडफोडी, दहशतवादी पकडल्याने अशा अनेक विविध विषयांवर अनेक शहरे ब्रेकिंग न्यूज देतात व दिवसभर गाजत राहतात; त्या तुलनेत नगर जिल्ह्यात खून व खुनी हल्ले आणि नसलेला पाऊस या व्यतिरिक्त कोणतीही ब्रेकिंग न्यूज नाही. याचा आनंद व्यक्त करायचा की खंत, हाच खरा प्रश्‍न आहे, पण आमचे नगर कोणत्याही ब्रेकिंग न्यूजमध्ये नसल्याने हे शहर व जिल्हा जिवंत आहे की नाही, असा प्रश्‍न राज्यातील अन्य शहरवासीयांना पडू शकतो. आमच्याकडे राज्य गाजवेल अशी कोणतीही घटना एवढ्यात घडली नसल्याने सामान्य नगरकर व जिल्हावासीय काहीसे सुखात आहेत व ‘ठेविले अनंते तैसेचि राहावे’ या मानसिकतेचे आहेत. अर्थात हे कौतुक आहे की खंत, हा व्यक्तीसापेक्ष विचार आहे. 

दीड-दोन वर्षांपूर्वी नगरच्या सिव्हिल हॉस्पिटल मध्ये अतिदक्षता विभागाला आग लागून त्यात 14 रुग्णांचा मृत्यु झाला. ही घटना दिवाळी भाऊबीजेच्या दिवशी घडली. तो दिवस राज्यात नगर शहर गाजवून गेला. सर्व प्रमुख टीव्ही चॅनलवर दिवसभर हीच बातमी सुरू होती. त्यानंतर हळूहळू या घटनेचा नगरकरांसह सर्वांनाच विसर पडला. सिव्हीलमधली ही आग नेमकी कशामुळे लागली, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. महाविकास आघाडीच्या काळातील पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दर महिन्याच्या पत्रकार परिषदेत पुढच्या पत्रकार परिषदेला सिव्हिल आगीचे नक्की कारण सांगतो, असे ‘चल पुढच्या ओढ्याला...’ करीत-करीत अखेरपर्यंत कारण सांगितलेच नाही. त्यानंतर त्यांच्यासह त्यांचे महाविकास आघाडी सरकार कोसळले व राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तारूढ झाले. त्यांच्या काळात नगर जिल्ह्याचे सुपुत्र राधाकृष्ण विखे-पाटील पालकमंत्री झाले. ज्यावेळी सिव्हिल आगीची घटना घडली, त्यावेळी त्यांनी या घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे पालकमंत्री झाल्यावर सिव्हीलच्या आगीचे नेमके कारण ते तरी सर्वांना सांगतील असे अपेक्षित होते. मात्र पालकमंत्री होऊन आता सव्वा वर्ष होत आले, तरी त्यांनीही अजूनपर्यंत कारण सांगितलेले नाही. पालकमंत्री झाल्यानंतरच्या सुरुवातीच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कारण सांगण्याचे आश्‍वासन दिले होते, पण ते विसरले व आता या कारणाच्या मागे लागलेले सारे पत्रकारही वैतागून विसरून गेले, पण मूळ विषय म्हणजे दीड वर्षांपूर्वीच्या या ब्रेकिंग न्यूज नंतर नगर जिल्ह्यात अशी दिवसभर रतीब घातल्यासारखी चालेल अशी कोणतीही मोठी चांगली-वाईट घटना घडलेली नाही.

नगर जिल्ह्यातील अकोल्याला फक्त मोठे डोंगर आहेत. त्यावर दिवसभर पाऊस कोसळत असतो; परंतु दोन डोंगरांच्यामध्ये वसलेल्या फोपसंडी गावाव्यतिरिक्त कोठेही नैसर्गिक आपत्तीची फारशी भीती नाही. अन्य जिल्हाभरात कोठे दरड कोसळणे व मोठा पूर येणे अशा घटना अभावाने घडतात. मात्र, राज्याच्या बातम्यांमध्ये दिवसभर जरी नसले तरी काहीअंशी नगर जिल्ह्यातील गुन्हेगारी नेहमी झळकत असते. नगर शहरात मागील दीड-दोन महिन्यात लागोपाठ दोन खून पडले, याशिवाय गुन्हेगारी टोळ्यांचे एकमेकांवरील हल्ले सुरूच आहेत, अल्पवयीन मुली फसवण्याचे प्रकार सुरू आहेत, जातीय वादविवाद व दंगली होतात,  दरोडे-चोर्‍या-रस्तालुटी-फसवणूक, ऑनलाईन लुबाडणूक असे राज्यात सर्वत्र सुरू असलेले प्रकार नगर शहर व जिल्ह्यातही जोरात आहेत. अर्थात सगळीकडेच अशा बातम्या असल्याने या ब्रेकिंग न्यूज होत नाहीत. तेवढ्यापुरती दखल घेऊन सादरीकरण झाले की राज्यातील चॅनेल्स नव्या ब्रेकिंगच्या शोधात राहतात, पण स्थानिक चॅनल मात्र घडलेल्या घटनांचा पाठपुरावा करून या बातम्यांचे दळण दळत असतात. 

नगर शहरात सीना नदी वाहते; पण या नदीमध्ये वाळू नाहीये. परिणामी ती उपसण्याचा प्रश्‍नच नसल्याने वाळू तस्करांचा उच्छाद नाही, शिवाय सीना नदी ही आमची गटारगंगा, त्यामुळे तिच्या दुर्गंधीव्यतिरिक्त नगरला तिच्यापासून वेगळा फायदा-तोटा नाही. नगर शहरातील मध्य भागात रस्त्यांवर खड्डे आहेत. मात्र ते कोठे नाहीत? मुंबईतही आहेत. त्यामुळे खड्डे ही आमच्याकडे आता बातमी होत नाही. जिल्हाभरात पुरेसा पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट आहे. ते हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख रोज मुसळधार पावसाचे अंदाज देतात, परंतु हा पाऊस नगर सोडून इतरत्र बरसतो. त्यामुळे नगर ब्रेकिंग न्यूजमध्ये येत नाही, याचे सुख मानायचे की दुःख हा खरा प्रश्‍न आहे, पण नगर ब्रेकिंगमध्ये येत नसल्याने नगर जिल्हा जिवंत आहे की नाही असा प्रश्‍न पडू शकतो.

परंतु याची दुसरी बाजू पाहिली तर सध्याच्या स्थितीवर नगरकर खूप खूश आहेत. पाऊस नसल्याने रस्त्यातील खड्डे पाण्याने भरलेले नाहीत, परिणामी ते आम्हाला रस्त्याने जाताना चुकवता येतात. महापालिकेत रोज काही घडत नाही, सर्व नगरसेवकांना डिसेंबरअखेरीच्या निवडणुकीचे वेध लागलेले आहेत. जिल्हा परिषदेवर तर प्रशासकच आहे. त्यांचे काम जोरात सुरू आहे. नाही म्हणायला जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठका होतात. ‘शासन आपल्या दारी’ जोरात सुरू आहे. राज्यात मागील पंधरा-वीस दिवसांत खूप राजकारण घडल्याने बडी राजकीय मंडळी नगर मार्गे ये-जा करीत असली तरी नगरला थांबत नाहीत व थांबली तरी कोणाशी फारसा संवाद करीत नाहीत. त्यामुळे त्याही बातम्या नाहीत, फक्त पालकमंत्री बैठकीच्या प्रेस नोट्स नियमित येतात. दुसरीकडे दिवसभर ढगाळ हवामान आहे. अशा वातावरणामुळे आजारपणे वाढत चालली आहेत, पण तसे पाहिले तर आम्ही ब्रेकिंगमध्ये नसल्याने सुखी आहोत. तेव्हा इतरांनी आमच्यावर जळू नका, एव्हढेच सांगण्यासारखे आहे व हे सांगणेही ब्रेकिंग न्यूज होऊ शकते, यावर कोणाचा विश्‍वासही नाही....

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा