भाजपचे नवे कारभारी



तव्यावरची भाकरी फिरवली नाही तर ती करपते असे बोलले जाते. राजकारणही याला अपवाद नसते. जशा शासकीय नोकर्‍यांमध्ये दर अडीच-तीन वर्षांनी अधिकार्‍यांच्या बदल्या होतात तसेच राजकीय पक्षातही अडीच-तीन वर्षांनी स्थानिक स्तरावर कारभारी बदलले जातात. नगर जिल्हा भाजपमध्ये नुकतेच बदललेले कारभारी आता चर्चेत आहेत. भाजपने नवे कारभारी दिले असले तरी जुनीच भाकरी फिरवली की काय अशी शंका व्यक्त होत आहे. नगर शहराच्या जिल्हाध्यक्षपदी अभय आगरकर व नगर उत्तर जिल्हाध्यक्षपदी विठ्ठलराव लंघे ही दोन नावे तशी जुनीच आहेत. आगरकरांनी याआधीही शहर जिल्हाध्यक्षपद भूषवले आहे; तर लंघे यांनी याआधी संपूर्ण ग्रामीण जिल्ह्याचे अध्यक्षपद सांभाळले आहे. फक्त या दोघांच्या जोडीला नगर तालुक्यातील वाळकीचे सुपुत्र दिलीप भालसिंग हे दक्षिण नगर जिल्ह्याचे झालेले जिल्हाध्यक्ष एकमेव नवा चेहरा आहेत. अर्थात आता या तीनही जिल्हाध्यक्षांच्या कार्यकर्तृत्वाचा कस आगामी सर्वच निवडणुकांमध्ये लागणार आहे. भाजपमध्ये बदल होण्याच्या बातम्या बर्‍याच दिवसांपासून माध्यमांमध्ये येत होत्या. त्या बातम्यांना आता यानिमित्ताने पूर्णविराम मिळाला आहे. 

भाजप हा केंद्रातील सत्ताधारी पक्ष आहे व मागील वर्षभरापासून राज्यातही सत्तेत आहे. त्यामुळे या सत्ताधारी पक्षातील घडामोडी नेहमीच उत्सुकतेच्या असतात. या पक्षात मूळचे भाजपवाले किती व बाहेरून अन्य पक्षांतून आलेले किती, असा नेहमी प्रश्‍न असतो. निष्ठावंतांना डावलले जाते असा नेहमीच आरोप केला जातो व बाहेरून आलेल्यांना सत्तेचा मलिदा चाखायला मिळतो असेही दावे होतात. नगर जिल्ह्यात मूळ भाजपचे म्हणून केवळ कर्जत-जामखेडचे प्रा. राम शिंदे सोडले तर बाकी विखे पिता व पुत्र, कर्डिले, राजळे, पाचपुते, कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, पिचड अशी बहुतांश मंडळी काँग्रेस व राष्ट्रवादीतून आली आहेत. मात्र याच मंडळींनी आता पक्षावर पकड मिळवली आहे. त्यामुळे स्थानिक जिल्हाध्यक्ष वा अन्य कारभारी निवडण्यातही याच मंडळींचा मोठा हस्तक्षेप नेहमी असतो. नव्याने झालेल्या नियुक्तीतूनही हेच दिसत आहे. ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग तर माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचे कट्टर समर्थक मानले जातात. लंघे व आगरकर यांनी विखे यांच्याशी जुळवून घेतल्याचे बोलले जाते. आगरकर व लंघे यांनी याआधी भाजपला सोडून राष्ट्रवादीशी घरोबा केला होता. लंघे यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपदही भूषवले आहे. आगरकर यांनी आमदारकीसाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला पण तेथून उमेदवारी मिळाली नसल्याने अपक्ष निवडणूक लढवली होती; अर्थात त्यात यश आले नाही. त्यामुळे त्यांनी पुन्हा स्वगृही म्हणजे भाजपमध्ये परतण्यास प्राधान्य दिले. परिणामी पक्षातील राज्यस्तरीय जुन्या नेत्यांनी ‘सुबह का भूला श्याम को घर वापस आये तो उसे भूला नही कहते’ असे म्हणत त्यांना पुन्हा पावन करून घेतले व नंतर 2014च्या निवडणुकीत त्यांना आमदारकीची उमेदवारीही दिली. अर्थात यावेळीही त्यांना यश आले नाही. मात्र, आता पुन्हा शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांच्यावर पक्षाने विश्‍वास व्यक्त केला आहे. लंघे यांच्यावरही पक्षाचा जुना नेता म्हणून विश्‍वास व्यक्त केल्याने त्या विश्‍वासाला पात्र राहण्याची नवी जबाबदारी लंघे व आगरकर या दोघांनापण पार पाडावी लागणार आहे. भाजप पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्‍वास सार्थ करून दाखवावा लागणार आहे. पूर्वीपासून नगर जिल्ह्याच्या राजकारणाशी परिचित असलेल्या या त्रिकूटाला ही कामगिरी फार अवघड असण्याचे कारण नाही. मात्र प्रामाणिक प्रयत्न करावे लागणार आहेत.

अहमदनगर महापालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये आहे, तसेच सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षण विषय मार्गी लागल्यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या तसेच नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्या झाल्यानंतर लोकसभा व वर्षभराने विधानसभा या मोठ्या निवडणुका आहेत. अशा सर्व निवडणूक काळात आगरकर, लंघे व भालसिंग या तिघांचा कस लागणार आहे. अर्थात त्यांच्या मागे विखे-कर्डिले-राजळे-पाचपुते-कोल्हे-पिचड अशा दिग्गज नेत्यांची ताकद असणार आहे. फक्त त्यांच्यासमोर एकच अडचण असणार आहे व ती म्हणजे जागा वाटपाची. कारण आता राज्यातील भाजपच्या सरकार समवेत शिवसेनेतून आलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गट व राष्ट्रवादीतून आलेले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट या दोन वाटेकर्‍यांना व त्यांच्या जिल्ह्यातील समर्थकांना सांभाळून व सामावून घेऊन भाजपचा झेंडा उंचवावा लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील नव्या आव्हानांना साप्ताहिक ज्ञानधारा परिवाराच्या हार्दिक शुभेच्छा व नूतन तीनही पदाधिकार्‍यांचे हार्दिक अभिनंदन...!

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा