आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक
समाजाचे नेतृत्व करणारे राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट -नगिनाताई कांबळे
आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या मातंग समाज संपर्क दौरा अभियानाची शहरात बैठक
पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधून विविध प्रश्नांवर चर्चा
अहमदनगर - मातंग समाजात श्रेय घेण्याच्या नादात समाजातील प्रश्न सुटले नाही. समाजाचे नेतृत्व करणारे काही नेते राजकीय पुढाऱ्यांच्या दावणीला बांधले गेल्याने मातंग समाजाची ससेहोलपट सुरु आहे. भावी पिढीच्या कल्याणासाठी व न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी संघर्ष करुन समाजाला जागृत करावे लागणार असल्याची भावना आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या संस्थापक अध्यक्षा नगिनाताई कांबळे यांनी व्यक्त केली.
मातंग समाजाच्या न्याय हक्कांसाठी आधुनिक लहूजी शक्ती सेनेच्या वतीने राज्यभर सुरु असलेला मातंग समाज संपर्क दौरा अभियानानिमित्त कांबळे नगरमध्ये आले असता, जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या. या बैठकीसाठी राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे, आढळगावचे सरपंच पै.बंटी उबाळे, नागवडे दूध संघाचे संचालक विनायक ससाणे, सुनिल कांबळे, जय हिंद माजी सैनिक संघटनेचे मेजर निलकंठ उल्हारे, जिल्हा सदस्य डॉ. विजय नेटके, जिल्हा महासचिव किरण उमाप, जिल्हा संघटक संदीप नेटके, विद्यार्थी आघाडीचे अजय शिंदे, महिला आघाडीच्या हिराताई गोरखे, सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय गोरखे, सचिन नवगिरे, किशोर गाडे, व्यापारी हरिभाऊ लोंढे, विशाल गाडे, लखन शेंडगे, बाळासाहेब उल्हारे, दादा उल्हारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे कांबळे म्हणाल्या की, संघटनेचे पद मिरवण्यासाठी नव्हे, तर समाजाच्या सेवेसाठी आहे. पुढारपणाने फिरणे म्हणजे समाजसेवा नाही. समाजाचे नेतृत्व करताना समाजातील प्रश्न सोडविता आले पाहिजे. जे शिकले, ज्यांनी शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेतला त्यांचा विकास झाला. मात्र मोठ्या प्रमाणात अडाणी वर्ग असलेला मातंग समाज विकासापासून वंचित राहिला आहे. समाजाला अ, ब, क, ड वर्गवारी नुसार आरक्षणाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्य प्रवक्ते लक्ष्मण क्षीरसागर म्हणाले की, आधुनिक लहूजी शक्ती मातंग समाजाचा सर्वांगीन विकास हेच एकमेव ध्येय समोर ठेऊन कार्यरत आहे. स्व. सोमनाथभाऊ कांबळे यांच्या विचाराने चळवळ रुजवून कार्य केले जात आहे. न्याय हक्कांसाठी प्रखर संघर्षाने समाजाला प्रवाहात आणण्याचे कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष संतोष शिंदे म्हणाले की, मातंग समाजावर सुरु असलेल्या अन्यायाचा बिमोड करण्यासाठी आधुनिक लहूजी शक्ती सेना संघर्ष करत आहे. समाजाला एकजुट करुन विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी चळवळ उभी करण्यात आली आहे. कोणताही राजकीय स्वार्थ न पाहता, संघटनेची वाटचाल सुरु असून, जिल्ह्यात मोठा समाज वर्ग संघटनेला जोडला गेला असल्याचे त्यांनी सांगितले. तर लवकरच जिल्ह्यातील विविध पदांच्या व तालुका पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या बैठकीत जिल्हा सचिवपदी अर्जुन ऊर्फ माधव उल्हारे, श्रीगोंदा तालुका सल्लागारपदी बाबुराव खवळे, नगर शहराध्यक्षपदी नवनाथ शिंदे, कर्जत तालुकाध्यक्षपदी लखन जगताप, उपाध्यक्षपदी शत्रूघ्न डाडर, संपर्कप्रमुखपदी लालासाहेब जगताप यांची नियुक्ती करण्यात आले. या नवनिर्वाचित पदाधिकारी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर अनुसूचित जातीला अ, ब, क, ड वर्गवारी नुसार आरक्षण मिळावे, क्रांती गुरु लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, समाजाच्या विकासाला चालना देण्यासाठी अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ योजनेच्या जाचक अटी रद्द करावे, महाराष्ट्रात अनुसूचित जमातीवर वाढते अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत राज्य सरकारशी सुरु असलेल्या पाठपुराव्याबाबत कार्यकर्त्यांशी चर्चा करण्यात आली.
Comments
Post a Comment