निमगाव वाघातील विद्यालयात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान
शिक्षण संचालनालयच्या प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर उपक्रमांतर्गत
निमगाव वाघातील विद्यालयात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान
प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी घेतली पर्यावरण रक्षणाची शपथ
अहमदनगर - महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयच्या वतीने सुरु असलेल्या प्रोजेक्ट लेट्स चेंज- स्वच्छता मॉनिटर 2023 उपक्रमांतर्गत निमगाव वाघा (ता. नगर) येथील नवनाथ विद्यालयात स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या सहकार्याने वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या प्लास्टिक मुक्तीचा संदेश देऊन विद्यार्थ्यांनी पर्यावरण रक्षणाची शपथ घेतली.
विद्यालयाच्या प्रांगणात माजी सरपंच साहेबराव बोडखे व माजी मुख्याध्यापक किसन वाबळे यांच्या हस्ते वृक्षरोपण मोहिमेची सुरुवात करण्यात आली. यावेळी प्र. मुख्याध्यापक उत्तम कांडेकर, डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, निळकंठ वाघमारे, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, तेजस केदारे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, अमोल वाबळे, भानुदास लंगोटे, तृप्ती वाघमारे, प्रमोद थिटे, प्रशांत जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदीप डोंगरे, प्रतिभा डोंगरे आदी उपस्थित होते.
साहेबराव बोडखे म्हणाले की, वृक्षरोपण व स्वच्छता अभियान ही फक्त शासनाची जबाबदारी नसून, समाजातील प्रत्येकाचे कर्तव्य आहे. निरोगी आरोग्यासाठी स्वच्छता चळवळ सर्वांनी कृतीत उतरवली पाहिजे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्षरोपण व संवर्धनाची गरज आहे. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी, जमिनीची धूप थांबविण्यासाठी तसेच ऑक्सिजनचे प्रमाण वाढवून मानवाचे जीवन वृक्षरोपणाने सुरक्षित करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, औद्योगिकरणामुळे एकीकडे विकास होत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने प्लास्टिकचा कचरा पर्यावरणासह पशु-प्राण्यांना हानी पोहचवत आहे. प्लास्टिक बंदीसाठी नागरिकांनी स्वत: पुढाकार घेण्याची गरज आहे. पर्यावरण रक्षण म्हणजेच सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी वृक्षारोपण व प्लास्टिक मुक्ती हा एकमेव पर्याय असल्याचे त्यांनी सांगितले.
किसन वाबळे यांनी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून प्रत्येकाने एक झाड लाऊन सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment