जगाच्यi पोशिंद्याला शेतकरीदिनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे_ खंडागळे
मुर्शतपुर व धiरणगाव येथे शेतकरी दिन साजरा करण्यात आला, शेतकऱ्यांना यावेळी शेती शाळा बॅगचे वाटप करण्यात आले. |
जगाचा पोशिंदा शेतकरी असून कमी पाण्यात, कमी खर्चात त्याच्या शेतीची उत्पादकता वाढली पाहिजे यासाठी तालुक्यातील मुर्शतपुर व धारणगाव परिसरातील शेतकऱ्यांना महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत निफाड येथील वरिष्ठ संशोधक पोपटराव खंडागळे यांनी डॉ. विखे पाटील यांच्या १२१ व्या जयंती शेतकरीदिनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे देऊन शेतकरी दिन साजरा करण्यात आला. उपस्थित शेतकर्यांना यावेळी शेतीशाळा बॅगेचे वाटप करण्यात आले. प्रारंभी कोपरगाव तालुका कृषी विभागाच्या सहाय्यक कृषी अधिकारी संगीता सोळसे यांनी शेतकरी दिन का साजरा करावा याचे प्रास्ताविक केले. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील प्रतिमेचे यावेळी पूजन करण्यात आले.
वरिष्ठ कृषी संशोधक पोपटराव खंडागळे म्हणाले की, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांपर्यंत शासनाच्या विविध योजना पोहचविल्या आहेत. शेती करताना आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणं हे महत्त्वाचे आहे. तंत्रज्ञान प्रगत आहे, त्याचा शेतकऱ्यांनी वेळोवेळी लाभ घेतला पाहिजे. देशांच्या उच्च तंत्रज्ञान विज्ञान विभाग मंत्रालयाने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी स्वतंत्र उपग्रह अवकाशात सोडून त्याद्वारे मिळणाऱ्या माहितीचे अदान-प्रदान वेगाने सुरू ठेवले आहे. खरीप व रब्बी पिकात एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव झाला तर त्याला जागेवर आटोक्यात आणण्यासाठी काय उपाय योजना केल्या पाहिजेत, प्रगत दर्जेदार पिकासाठी कमी पाण्यात अधिक उत्पादन देणाऱ्या बियांण्याची निवड, लागवडीपूर्वी शेतकऱ्यांनी करावयाच्या उपाययोजना, ऊस लागवडी अगोदर व नंतर विशिष्ट बाबी शेतकऱ्यांनी पाळल्या नाही तर उत्पादनात घट येते, तेव्हा ही घट होऊ नये यासाठी काय केले पाहिजे, पीक जोमदार यावे त्यासाठी शेणखत- पायखत मात्रा, माती व पाणी परीक्षण शेतकऱ्यांना का गरजेचे आहे, इत्यादी बाबत व शेत मालाचे मार्केटिंग शेतकऱ्यांनी स्वतः कसे करावे याबाबत मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या प्रश्नोत्तराचे समाधान केले. आधुनिक तंत्रज्ञानात महात्मा फुले कृषी विद्यापीठ कसे सरस आहे याबाबत विवेचन करून केंद्र व राज्य शासनाच्या कृषी योजनांची खंडागळे यांनी शेवटी माहिती दिली. याप्रसंगी सरपंच साधना दवंगे (मुर्शतपुर), सरपंच नाना चौधरी (धारणगावं), सर्वश्री रामदास शिंदे, हरिभाऊ शिंदे, अनिल दवंगे, सुनील दवंगे, विक्रांत रासकर, सदाशिव रासकर, राहुल चौधरी, दादासाहेब उगले, राजेंद्र जाधव आदी शेतकरी उपस्थित होते.
Comments
Post a Comment