हवामानातील बदल - एक आव्हान...परिणाम व उपाय योजना
कोपरगाव प्रतिनिधी
हवामानातील होत असलेला बदल, मोसमी पावसाची एकूण वितरण पध्दती व पारंपरिक गुणधर्मावर गंभीर परिणाम करणारा असल्याचे, अलिकडील काळात निदर्शनास येऊ लागलेले आहे. मोसमी पावसाची पडण्याची पध्दत, एकूण पाऊसमान, एकूण पाऊसकाळ या मुख्य घटकांमध्ये अलीकडील तिन चार वर्षांत जाणवण्याइतपत बदल झाल्याचे दिसून येत आहे. वास्तविक ह्या बदलास, सुक्ष्म स्वरुपात चालू दशकाच्या अगोदर पासून सुरवात झालेली आहे. मात्र बदल सुक्ष्म असल्याने फारसे जाणवले नाहीत. मात्र गेल्या तीन चार वर्षापासून यातील बदल प्रकर्षाने जाणवण्यास सुरवात झाली आहे. जागतिक स्तरावरील पर्यावरण, वाढते तापमान, हरीतगृह परिणाम याचा एकत्रित परिणामस्वरुप सध्याचा बदल होऊ घातला आहे. भविष्काळातही थोड्याफार फरकाने हा बदल अशाच स्वरुपात वाढता राहाणार आहे. हा होऊ घातलेला वा होत असलेला बदल, गेल्या साठ सत्तर वर्षात मोसमी पावसाच्या संदर्भाने प्रस्थापित झालेल्या विविध घटकांवर विपरीत परिणाम करणारा ठरणार आहे.
यासंदर्भात 'इंटरगव्हर्मेंटल पॅनेल आॅन क्लायमेट चेंज' ( IPCC ) , या यूनो संलग्न असलेल्या आणि 85 देशातील 830 तज्ञांनी सन 2013 व 2014 मध्ये जाहिर केलेल्या पाचव्या अहवालात ( AR5 ), 1950 पासून ते 2100 पर्यंत बदलत जाणाऱ्या ( Trend ) तापमान, पाऊसमान, समुद्र पातळी,हिमाच्छादन, कार्बन उत्सर्जन, पिके, टोकाच्या (Extreme) पावसामुळे होणारी हानी, जीवनमान /आरोग्य यासारख्या काही महत्त्वाच्या बाबींच्या संदर्भातील बदलाचे सुतोवाच, ठळकपणे नमुद केलेले आहेत.
दक्षिण आशिया संदर्भात IPCC ने या बदलाचा परामर्श घेऊन, निरिक्षणाचे आधारे नमुद केलेल्या बाबी, आपण खरेतर अलिकडील तिन चार वर्षांत कमी जास्त प्रमाणात अनुभवत आहोत.
महत्वाची बाब म्हणजे गेल्या साठ सत्तर वर्षापासून सेट झालेल्या मोसमी पावसाच्या विविध अंगात आमुलाग्र बदल होत आहेत किंवा होऊ घातले आहेत आणि वर्षांगणिक कमी जास्त स्वरुपात त्याची धग दखलपात्र होत आहे.
पुर्वी पावसाळा हिवाळा उन्हाळा या ठळक असलेल्या ऋतूंच्या सिमारेषा अंधुक होत जाणार आहेत. पुर्वी जून 20 टक्के, जुलै 30 टक्के, आॅगस्ट 30 टक्के आणि सप्टेंबर 20 टक्के असे खरिपास पोषक असलेले पावसाचे वितरण असायचे आणि आपण ते अनुभवलेही आहे . 'नेमेची येतो मग पावसाळा' अशी साहित्यविश्वात नोंद होण्याइतपत नियमितपणा, मोसमी पावसाने निर्माण केला होता. कधी तरी वळवाचा/अवकाळी /वादळी पाऊस पडायचा. आता येत्या काळात नेहमीच्या मोसमी पावसाऐवजी ज्याला आपण बिगरमोसमी /वळवाचा/अवकाळी /वादळी पाऊस म्हणतो याचाच जास्त प्रभाव राहाणार आहे. अर्थातच त्याअनुषंगाने नुकसानीला सामोरे जावे लागेल हे ओघाने आलेच. पुर्वापार चालत आलेल्या चक्रीय वादळांच्या संखेत मोठ्या प्रमाणावर वाढ होऊन ती वर्षभरात केंव्हाही सातत्याने होणार आहेत.
जागतिक तापमान वाढीमुळे पृथ्वीवरील तापमानाचे पट्ट्यात बदल होत आहेत तसेच पृथ्वीवरील सेट झालेल्या वाऱ्यांच्या जुन्या दिशेतही बदल होत असुन नव्या दिशेत ते सेट होणार आहेत. त्याचा परिणाम म्हणून जादा पावसाच्या प्रदेशातील ( चेरापुंजी सारखे अव्वल पावसाचे ठिकाण) पाऊस मान घटून कमी पावसाच्या अवर्षणग्रस्त वा दुष्काळी /वाळवंटी (आफ्रिकेतील सहारा, राजस्थान व परिसरातील थरचा वाळवंटी भाग ) भागात पाऊसमान जादा राहाणार आहे.
पाऊसाची संततधार लागणे, सर्वदुर पाऊस पडणे, भिज पाऊस होणे, पाउस लागुन राहणे हे पावसाचे पुर्वीचे गुणधर्म हळुहळु गायब होणार आहेत. आता एक दोन तासात क्युमीलोनिंबस काळ्याकुट्ट ढगांनी आकाश भरले जाऊन अक्षरशः 'मूसळ' धार / ढगफुटी सदृश्य गडगडाटी पाऊस पडणे, पावसाचा दिर्घ काळ खंड पडणे, एकूण पाऊसमानात काही भागात वाढ वा घट होणे या नव्या स्वरुपात तो हजेरी लावण्याच्या प्रमाणात वाढ होणार आहे. कमी वेळात जादा पाऊस झाल्याने वारंवार पुरस्थिती येण्याच्या घटनांत वाढ होईल. यामुळे अर्थातच पिकहानी, रोगराई, वादळी वाऱ्यांची तिव्रता वाढणे, जिवितहानी, महापूर, जमीन वाहुन जाणे, रस्ते, पुल, बंधारे फुटणे यात वाढ होत जाणार आहे. त्यामुळे सध्याची बंधारे, धरणे, पुल, नाले, ओहोळ यांच्या वहन क्षमतेचे पुनर्विलोकन होणे आवश्यक आहे. कमी वेळेत जादा पाऊस पडल्याने जमीनीत पाणी मुरण्यास कमी वेळ मिळेल व भुजलभरण होण्यास अडथळा होईल. त्यासाठी मोठ्या प्रकल्पांऐवजी सर्वदुर जलसंधारण कामे व शेततळ्यांची नेटवर्क कसे होईल याला प्राधान्य द्यावे लागेल. विशेष म्हणजे जिरायती क्षेत्राबरोबरच सिंचन सुविधा असलेल्या भागातही ही योजना राबविली जाणे आवश्यक आहे.
दक्षिण आशियात समाविष्ट असलेले व मोसमी पाऊस पडणारे देश भारत, अफगाणिस्तान, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश , नेपाळ, भुतान, मालदिव हे हवामान बदलांमुळे जास्त प्रभावीत होणार आहेत. भारताच्या बाबतीत आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र, छत्तीसगड, मध्यप्रदेश, गुजरात व राजस्थान ही राज्ये जादा प्रभावीत होणार आहेत.
या बदलत्या बदलास अनुरुप होण्यासाठी आपणाला पुर्वापार चालत आलेली शेती मशागत, पेरणी, काढणी, पिक पध्दती आणि शेती कामाचे वेळापत्रक याबरोबरच छोटे, मध्यम वा मोठे या सर्व बंधाऱ्यांचे सांडवा संकल्पन व बांधणी यात वाढत्या पुरस्थितीच्या अनुषंगाने, मुळातून फेरबदल करावे लागतील. सध्याच्या पिक पध्दतीत बदल करुन वादळी वारे, मुसळधार / ढगफुटीचा / धुंवाधार व वर्षाच्या कोणत्याही काळात पडणारा जादा पाऊस / जोडीला चक्रीय वादळे या साऱ्यांपुढे तग धरणाऱ्या पिकांकडे जावेच लागेल.
पॅसिफिक महासागराच्या पुर्वेकडे आणि दक्षिण अमेरिका खंडाच्या पेरु चिली या देशांच्या पश्चिम किनाऱ्यानजीक निर्माण होत असलेल्या 'एल' निनोच्या ( म्हणजे आपल्याकडे कमी पाऊस ) संखेत घट होऊन 'ला' निनोचे (म्हणजे आपल्याकडे जादा पाऊस) प्रमाण वाढते राहील. मोसमी आणि चक्रीय वादळे या दोन्हीमूळे पावसाचे मान जादा राहणार आहे. परंतु ते विखुरलेल्या स्वरुपात राहील.
हवामान खात्याचे अंदाज पुर्वी पासूनच विस्तृत भुभागासाठी दिले जातात. त्याआधारे सर्वच शेतकरी पिके घेण्यासाठी भांडवली गुंतवणूक करतात. (चार चार महिन्यासाठी प्रत्येक वर्षी हा पारंपरिक जुगार शेतकऱ्यांकडून खेळला जातोच ) कुठेतरी पाऊस पडला की हवामान संस्था स्वतःची पाठ थोपटून घेते... हवामान खात्याचा अंदाज आणि एका राशीच्या सर्वांसाठी सारखेच वर्तवलेले भविष्य यात कमालीचे साम्य दिसून येते. म्हणजे काहीही झाले तर कुठे ना कुठे त्यांचा अंदाज "खरा" ठरतो.
मात्र आता जागतिक हवामान बदलाच्या या पार्श्वभूमीवर हवामान खात्याच्या अंदाजाची विश्वासार्हता आणखीनच धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
त्यामुळे या बदलास सामोरे जाण्यासाठी काही बदल करणे अपरिहार्य आहेत. पारंपरिक पिक पध्दती, शेती मशागत व पेरणीचे वेळापत्रक यात आमुलाग्र बदल अपेक्षित आहेत. दुबार पेरणीची संकटे येण्याचे प्रमाण वाढणार असल्याने पाणी नियोजनात बदल अपेक्षित आहे. आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा (शेततळ्याच्या माध्यमातून), विशेष खबरदारी म्हणजे शेततळ्यातील पाणी पुढील वर्षी किमान १५ जुलै पर्यंतची गरज भागवेल अशा क्षमतेची करावी लागतील. वादळ वाऱ्यांचा सामना करु शकणारी कमी उंचीची तसेच काटक / जाड खोडांची पिके घेऊन नुकसानीत घट करणे. त्यासाठी कापुस, उडीद, मठ, मुग, भुईमूग, करडई, सोयाबीन, बटाटा, कांदा, हळद, कोबी, फ्लॉवर, मिरची, वांगी या किंवा या प्रकारच्या अन्य पिकांस प्राधान्य देणे संयुक्तीक राहिल. कृषी
विद्यापीठे वा अन्य संशोधन केंद्रात नवीन रोगराईला सामना करणारे व पाण्याचा ताण सहन करणारऱ्यां पिकांचे वाण संशोधित करणे गरजेचे आहे. नव्या हवामान बदलात नव्या बॅक्टेरिया, जीवाणू , कृमी, किडींची उत्पत्ती होईल. त्यासाठीची औषधे संशोधित करावी लागतील. नुसती पिकेच नव्हे तर मानवी आरोग्यावरही या हवामान बदलाचा गंभीर स्वरुपाचा परिणाम होणार आहे. या बदलास सामोरे गेल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही.
अगदी चालू वर्षाचा अनुभव विचारात घ्या. मान्सून आला की यायचा आहे, याबाबत सामान्य जनतेलाच नव्हे तर हवामान संस्थानाही चकवा बसला आहे. मान्सुन केरळात प्रथम येऊन नंतर देशभरात जातो. मान्सुनचा पाऊस ज्या पद्धतीने पडतो, तसा तो यावर्षी मुळीच पडलेला नाही. त्यात मान्सुन पुर्व म्हणजे वळवाच्या पावसाचेच गुणधर्म दिसले. मे महिन्यातील दूसऱ्या आठवड्यात आलेले अरबी समुद्रातील "तौक्ते" आणि मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आलेले बंगालच्या उपसागरातील "यास "या चक्रीवदळांनी मान्सुनचे वेळापत्रक एकदम बदलून टाकले आहे.... यात भर म्हणजे हवामान संस्थानी पुर्वीच्या घटकांनुसार गणिती आकडेमोडीच्या आधारे मान्सून आल्याचे घोषीत करुन टाकले. वास्तविक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर, त्या संदर्भ घटकांचेही पुनर्विलोकन होणे गरजेचे आहे. यावर्षी अत्यंत मोजक्या भागात, हा घोषीत केलेला "मान्सुन", वळवाच्या पावसासारखा धुवांधार कोसळला आणि आकाश निरभ्र होऊन सुर्य तळपायाला लागला. ज्या शेतकऱ्यांनी यावर विसंबून पेरणी केली, त्यांच्यापुढे दुबारपेरणीचे संकट आता आ वासून उभे राहिले आहे. वळवाच्या रुपात असलेल्या पावसाला नियमित मान्सून असल्याचे जाहीर केल्याने शेतकरी आर्थिक दृष्ट्या चांगलाच अडचणीत आला आहे. वातावरणीय बदल होऊन, मान्सूनचे हे विस्कळीत झालेले वेळापत्रक सुरळीत व्हायला जुलै महिन्याची वाट पहावी लागेल असे सध्याचे चित्र आहे. जागतिक हवामान बदलाचा झटका यापुढेही अशाच स्वरुपात समोर येत राहिल.आपण जर या बदलास अनुरुप बदल केले नाही तर, मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत राहील हे मात्र निश्चित !!उत्तमराव निर्मळ, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, जलसंपदा विभाग
Comments
Post a Comment