भातुकलीचे खेळ कालबाह्य


कोपरगाव प्रतिनिधी

भातुकली .....या शब्दामध्ये अख्खे बालपण सामावले आहे


लहानपणी प्रत्येकानेच घराच्या अंगणात एकदा तरी भातुकलीचा खेळ मांडला असेलच, पण काळाच्या ओघात अंगणाची जागा फ्लॅटने घेतली आणि भातुकलीची भांडी गाठोड्यातून माळ्यावर विसावलीत, विटि-दांडू, लगोरी हे खेळ आता कुठे बघायला मिळत नाहीत. नातवंडांबरोबर आलेल्या आजोबांना, मुलांबरोबर आलेल्या बाबांना हे जुने खेळ पाहून लहानपणीच्या विश्वात पुन्हा एकदा फेरफटका मारायला मिळतो.


पण एका आजोबांनी गाठोड्यात गुंडाळलेला हा खेळा पुन्हा बाहेर काढून चिमुकल्यांसाठी परत मांडला आहे. गेल्या 21 वर्षांपासून गावोगाव फिरून त्यांनी हा आगळावेगळा खजिना गोळा केला आहे. 3 हजारांहून अधिक वस्तूंचा हा खजिना सगळ्यांना बालपणात घेऊन जाईल आणि बालकांसाठी गंमत ठरेल...

टीव्ही, इंटरनेट, ई-मेल आणि मोबाइलच्या युगात रमणा-या आजच्या पिढीला पाटा वरंवटा, पाणी गरम करणारा बंब, विहिरीवरील रहाट, कोळशाची शेगडी, भोवरे, भिंग-या, चटक्याच्या बिया या वस्तूंची फारशी माहिती नाही. पूर्वी घराघरांत वापरल्या जाणा-या या वस्तूंच्या लहान प्रतिकृती भातुकलीच्या खेळात असायच्या. घराघरांत लहान मुलांचे भातुकलीचे खेळ रंगायचे.
भातुकली एक खेळ एवढ्यापुरता मर्यादित नाही, तर ही एक संस्कारक्षम क्रिया आहे. कालांतराने भातुकलीच्या कक्षा रुंदावल्या आणि विटी-दांडू, लगोरीचा प्रवास करत मुलांचे खेळ क्रिकेट, फुटबॉलपर्यंत पोहोचले. आता तर मुले मोबाइल आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकली आहेत.

अशा परिस्थितीत आपल्या समृद्ध परंपरेचा ठेवा असणा-या भातुकलींना पुनर्जीवित करण्याचे काम पुण्यातील शुक्रवार पेठेत राहणारे विलास नारायण करंदीकर करत आहेत. गेल्या 21 वर्षांपासून भातुकलीच्या खेळातील साहित्यांचा संग्रह त्यांनी जोपासला आहे. अशा प्रकारचा मोठा संग्रह जपणारे ते एकमेव संग्राहक असावेत

हलकाच धक्का दिला की माईच्या हातातलं जातं गरगर फिरू लागतं... हाताच्या मुठीत बसेल एवढ्या बंबात पाणी तापू शकते. टोपणाएवढ्या तव्यात वाईल चुलीवर भाकरी भाजता येते... काड्याच्या पेटीएवढ्या पाट्या-वरवंट्यावर मावशी पुरण वाटू लागते. 'भातुकली हा खेळ भारतीय एकत्रित कुटुंब पद्धतीचे प्रतीक आहे. घरातील संसार आणि पूर्वापार चालत आलेली कुटुंब संस्कृती या भातुकलीच्या खेळाच्या निमित्ताने मुलांना पाहता येत आहे. अनेक माहीत नसलेल्या गोष्टींची ओळख यातून होणार आहे.''

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा