कोरोना रोखण्यासाठी संवत्सर ग्रामपंचायतीने राबविलेली मोहीम प्रशंसनीय- खा. डॉ. विखे
ग्रामपंचायतीने आरोग्याचे दायित्व स्वीकारुन अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षक यांच्यामार्फत
गांवात कुटुंब तपासणीचे (सर्वेक्षण ) केलेले काम प्रशंसनीय असून या कामाचा इतरत्रही आदर्श घेतला जावा अशी अपेक्षा खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली.
कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी करण्याच्या उद्देशाने संवत्सर ग्रामपंचायतीने ' माझे कुटुंब - माझी
जबाबदारी' या मोहिमेअंतर्गत संवत्सर परिसरात तपासणी मोहीम राबवून रुग्ण संख्या आटोक्यात आणली. याकामी योगदान देणाऱ्या अंगणवाडी सेविका, आशा सेविका तसेच परिसरातील ९ शाळांचे शिक्षक यांच्यासाठी १ लाखाची कोविड संरक्षण विमा कवच योजना सुरु करण्यात आली. या विमा प्रमाणपत्रांसह
प्रशंसनीय कामाबद्दलचे प्रमाणपत्र वितरण खा. डॉ. सुजय विखे खा. सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत आज गुरुवारी संवत्सर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात खा. विखे बोलत होते. प्रारंभी जिल्हा
परिषदेचे सदस्य राजेश परजणे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रामस्थांच्यावतीने दोन्ही खासदारद्वयांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना संसर्गाची परिस्थिती गेल्या वर्षांपेक्षा अतिशय भयानक आहे. यावेळी ऑक्सीजनची गरज
भासू लागली आहे. मृत्युची संख्या वाढत चालली आहे. त्यात तरुणांचाही मोठ्या प्रमाणावर मृत्यू होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण देशभरात लसीकरण मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. या मोहिमेतून सुधारणा होण्यास हातभार लागेल. कुणीही लसीशिवाय राहणार नाही याची खबरदारी
ग्रामपंचायत स्तरावर घेतली गेली पाहिजे. त्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतींनी गांवातील प्रत्येक कुटुंबाची प्रशासकीय यंत्रणेमार्फत तपासणी करुन घेतली पाहिजे. अशा मोहिमा जर यशस्वी झाल्या तर कोरोना संकट दूर करण्यास वेळ लागणार नाही असे सांगून खा, विखे यांनी अंगणवाडी, आशा सेविका, शिक्षक,
ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांच्या कामाचे कौतुक केले.
खा. सदाशिव लोखंडे यांनीही संवत्सर ग्रामपंचायतीच्या कामाचा आढावा घेवून येथील विकास
कामांचे कौतुक केले. अंगणवाडी व आशा सेविकांच्या विविध प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा
करुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु असे आश्वासन दिले. कोरोना काळात संवत्सर ग्रामपंचायतीने
राबविलेला कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचेही खा. लोखंडे म्हणाले.
जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी मोहिमेविषयी माहिती देताना सांगितले की, कोरोना संकटाने जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अशावेळी कोरोना रुग्णांचे लवकर निदान झाल्यास त्यांच्यावर
तातडीने उपचार करता येतील या उद्देशाने संवत्सर ग्रामपंचायतीने माझे कुटुंब - माझी जबाबदारी' या
मोहिमेअंतर्गत अंगणवाडी सेविका, आशा सेविका आणि शिक्षक यांची २१ पथके तयार केली. या पथकांद्वारे दि. २३ ते २८ एप्रिल २०२१ असे सहा दिवस पहिल्या टप्प्यात गांवातील २,३०९ कुटुंबांचे सर्वेक्षण
करण्यात आले असून सुमारे १०, ८८८ लोकांची तपासणी केली आहे. बाधा असलेल्या रुग्णास तातडीने
पुढील उपचार दिले गेल्याने ते लवकर बरे होऊन घरी परतले. गेल्या आठवड्यापासून संवत्सर भागातील
रुग्णांच्या संख्येत कमालीची घट झालेली असल्याचेही श्री परजणे यांनी सांगितले.
याप्रसंगी उपसरपंच विवेक परजणे, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, गट
शिक्षणाधिकारी पोपटराव काळे, विस्तार अधिकारी सौ. शबाना शेख, प्रकल्पाधिकारी पंडितराव वाघिरे,
विशेष आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली बडदे, कृषी अधिकारी बाळासाहेब साबळे, संवत्सर प्रा. आ. केद्राचे
अधिकारी डॉ. खोत, अनिलराव सोनवणे, लक्ष्मणराव साबळे, बापुसाहेब तिरमखे, मुख्याधापक पठाण सर,
ग्रामविकास अधिकारी कृष्णकांत आहिरे उपस्थित होते. कोरोना काळातील सर्व नियमांचे पालन करुन
कार्यक्रम पार पडला.
Comments
Post a Comment