बारहाते कुटुंबियांचा नवसाला पावणारा चिंतामणी गणपती
कोपरगाव प्रतिनिधी
नागपूर मुंबई द्रुतगती मार्गावरील श्रीक्षेत्र संवत्सर (तालुका- कोपरगाव, जिल्हा- अहमदनगर) येथील बारहाते कुटुंबियांचा नवसाला पावणारा चिंतामणी गणपती अशी ख्याती असून हा गणपती असलेल्या जमिनी क्षेत्रात पाचशे वर्षापूर्वीचा गणपती पुरातन मानला जातो. त्यामुळे प्रत्येक संकष्ट चतुर्थीला येथे भाविक आपल्या मनोकामना पूर्ती साठी येतात.
संजीवनी कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव बाराहाते, या चिंतामणी गणपती विषयी माहिती देताना म्हणाले की, आपले आजोबा नानाजी विठोबा बाराहाते हे थोर गणपती भक्त होते. ते नित्यनियमाने गोदावरी नदीचे पाणी आणून पूजाविधी स्नान-संध्या झाल्याशिवाय अन्नग्रहण करीत नसत. गणपती तपश्चर्येने त्यांना दौलतराव व संपतराव ही दोन अपत्ये झाली. आपले वडील दौलतराव बाराहाते हे देखील गणपती भक्त होते. पेशवेकालीन पुरातन गणपती मूर्ती असल्याने मन प्रसन्न होते. आपल्याला जसे समजायला लागले तसं, 1976 सालापासून आपण गणपतीच्या भक्तीत तल्लीन होतो 46 वर्षांपासून या दैवताची पूजा अर्चा आपण करतो. प्रत्येकाचे संकट हरण करण्या चे अनेक अनुभव या चिंतामणी गणपती ने दिले आहे.
सध्या ज्या जमिनी क्षेत्रात चिंतामणी गणपतीची मूर्ती आहे. ते क्षेत्र गणपती नंबर म्हणून आजही प्रसिद्ध आहे. सन 2005 मध्ये या गणपती मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुढे भव्य सभामंडप उभारला आहे. पुरातन काळी जंगल झाडीत हे मंदिर होते. शेजारी गवळ्याची वस्ती होती. अखंड पंधरा ते वीस फूट लांबीचे या मंदिर स्थानावर दगडांचे कोरीव चिरे होते. या चिंतामणी गणपती स्थानावर प्रत्येक गणेश जयंतीला दोन हजार भाविकांना अन्नदानहि केले जाते. भविष्यात येथे चिंतामणी मंगल कार्यालय उभारण्याचा मनोदय असून भाविकांना सोयीसुविधा मिळाव्यात यासाठी आपला प्रयत्न आहे, असे शिवाजीराव बारहाते यांनी सांगितले.
Comments
Post a Comment