शिर्डी नगररस्त्यासाठी ४३० कोटी मंजूर होतात मात्र शिर्डी कोपरगाव मनमाड रस्त्याला एक छदामही दिला जात नाही हे मोठे दुर्दैव - सुखदीप सिंग उर्फ कुक्कु साहनी
अतिमहत्त्वाच्या रस्त्याच्या प्रश्नी आजी-माजी खासदार आमदार गप्प का ते झोपले आहेत का? असा केला सवाल
कोपरगाव (प्रतिनिधी) जागरूक-खासदार आमदार यांच्यामुळे राष्ट्रीय महामार्ग १६० या रस्त्यासाठी चारशे तीस कोटी मंजूर झाले, पण मग नगर-मनमाड राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी या रस्त्याला आज पर्यंत एक छदामही मिळू शकला नाही याचा अर्थ येथील आजी-माजी आमदार खासदार झोपलेले आहेत का? ते का उदासीन आहेत असा परखड सवाल शीख समाजाचे सामाजिक कार्यकर्ते सुखदीप सिंग उर्फ कुक्कूशेठ साहनी यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे.
पत्रकात त्यांनी पुढे म्हटले की दरवर्षी पावसाळ्यात नगर-मनमाड ७५२ जी महामार्गावर हजारो खड्डे पडतात त्यात अनेक जणांचे एक्सीडेंट होऊन काही मयत होतात थातूरमातूर डागडुजी करून दरवर्षी तोच नेहमीचा खेळ खेळला जातो. खाचखळग्याचा मार्गातून वाट काढत कोपरगाववासीयां सह विविध प्रवाशांचा प्रवास सुरूच राहतो. आज मितीस कोपरगाव शिर्डी या पट्टय़ात महामार्गाची अक्षरश: चाळण झाली आहे. त्यामुळे १४ किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी वाहनचालकांना दिड ते दोन तासांचा अवधी लागतो आहे. खड्डय़ांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते आहे. दरवर्षी महामार्गाच्या दुरवस्थेचा प्रश्न चर्चेत येतो. गल्लीपासून दिल्लीपर्यंत या मार्गावरील खड्डय़ाची चर्चा होते. संबंधित यंत्रणांना रस्तेदुरुस्तीची डेडलाईन दिली जाते. प्रत्यक्षात कुठलीही कारवाई होत नाही. मध्यंतरी नगर ते शिर्डी महामार्ग राष्ट्रीय महामार्ग १६० कामासाठी ४३० कोटी मंजूर झाले आहेत. मात्र राष्ट्रीय महामार्ग ७५२ जी शिर्डी ते कोपरगाव या रस्त्यासाठी आमदार खासदार यांच्याकडून निधी मंजूर करण्यासाठी सरकारवर दबाव आणण्याच्या कोणत्याही हालचाली व प्रयत्न दिसत नाही. असा आरोपही सहानी यांनी केला असून याबाबत येथील जनतेमध्ये या महत्त्वाच्या प्रश्नावरून मोठा रोष आहे.
कुंभकर्णी निद्रेत असलेल्या आजी माजी आमदार खासदार नगराध्यक्ष विविध पक्षाचे नेते व लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आधीच उद्ध्वस्त झालेल्या कोपरगावच्या बाजारपेठ व उद्योगावर आर्थिक संकटाची कुऱ्हाड कोसळली आहे त्यात या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे आणखीन मोठी भर पडणार असल्याची भीती सहानी यांनी व्यक्त केली आहे.
गुजरात मध्यप्रदेश सह विविध राज्यांना जोडणाऱ्या महामार्गावरून सुट्टीच्या कालावधीत शिर्डी साठी येणाऱ्या साई भक्तांची संख्या जास्त असते. त्यामुळे महामार्गावरील जड वाहने रिक्षा प्रवासी वाहतूक ऊस वाहतूक यासह लहान वाहनांची संख्याही वाढते. रस्ता रुंदीकरणाची काम जिथे झाली आहेत तिथेही रस्त्यांची अवस्था बिकट आहे. दुर्दैवाने स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी याबाबत का उदासीन आहेत.
रस्ता दुरुस्तीची थातूरमातूर कामे केली जातात. थोडय़ाशा पावसात पुन्हा रस्ता उखडून खड्डे तयार होतात. गेली सात वर्षे महामार्गाच्या कामाचे भिजत घोंगडे कायम तसेच आहे. यंत्रणा सुस्त आणि ठेकेदार मस्त अशी परीस्थिती कायम आहे. कोपरगाववासीयांच्या नशिबी मात्र खडतर प्रवासाचा मार्ग कायम आहे. लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळे आता कोपरगाव शिर्डी या रस्त्यासाठी शासन दरबारी आपली कारणे मांडून जनतेलाच लढा उभारावा लागेल असे सहानी यांनी शेवटी पत्रकात नमूद केले आहे.
Comments
Post a Comment