कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन शासनाने शाळा सुरु करण्याचा फेरविचार करावा - परजणे
कोपरगांव (प्रतिनिधी ) सद्या कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्याऐवजी वाढत चालल्याने सोमवार दि. २३ नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतचा राज्य शिक्षण विभागाने घेतलेला निर्णय ३१ डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदेचे शिक्षण समितीचे सदस्य राजेश परजणे प यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे एका पत्राद्वारे केली.जागतिक आरोग्य संघटनांनी पुढील वर्षाच्या प्रारंभीच कोरोनाची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केलेली आहे. कोरोना संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत लोकांमध्ये गांभिर्य नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी दिवाळीनंतर गेल्या चार पाच दिवसात शहरी आणि ग्रामीण भागात कोरोना बाधितांची संख्या
झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत शाळा सुरु केल्यास अनर्थ ओढावण्याची दाट शक्यता आहे. तसेच शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून देखील प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे तंतोतंत पालन होईलच असे वाटत नाही. शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या तपासण्या केल्या असता अनेक शिक्षक कोरोना बाधीत आढळून आलेले आहेत. या एकूण परिस्थितीमुळे पालक देखील हमीपत्र द्यायला तयार नाहीत, आणि ज्यांनी असे हमीपत्र दिलेच तर त्यापैकी ५० टक्केच विद्यार्थ्यांना वर्गात बसता येईल. वर्गात विद्यार्थ्यांना बसवताना
एकाआड एक बेंचवर बसवले जाणार असल्याने वर्गाची क्षमता, त्यामधील बाकांची संख्या व विद्यार्थी संख्या याचा मेळ कसा घातला जाणार आहे ? शिक्षकांच्या अंदाजानुसार एका वर्गात केवळ १० ते १५ विद्यार्थीच बसू शकतील. परिणामी वर्गात जागा नसल्यास शाळेत आलेल्या उर्वरीत विद्यार्थ्यांना परत पाठवले जाणार का ? असाही प्रश्न निर्माण होतो. शिवाय शाळा सुरु करण्यापूर्वी वर्गाचे निर्जंतुकीकरण करणे,
विद्यार्थ्यांच्या तापमानाची नोंद करणारी यंत्रे व इतर सुरक्षा सामुग्री खरेदी करणे अशी खर्चिक बंधने टाकल्याने त्यासाठी निधी कसा उपलब्ध होणार याचाही मोठाच पेच शाळा व्यवस्थापनापुढे निर्माण झालेला आहे. या नियमांचे काटेकोर पालन न झाल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होऊ शकतो त्यास जबाबदार
कोण राहील? असाही प्रश्न निर्माण होतो.
त्यामुळे धोका पत्करुन शाळा सुरु करण्याच्या राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करुन चालू शैक्षणिक वर्षच रद्द करुन निर्णय पुढे ढकलण्यात यावा. येत्या तीन - चार महिन्यात कोरोनावरील लस उपलब्ध होणार असल्याचे शासन पातळीवरुन सांगितले जात आहे. त्यामुळे लस उपलब्ध झाल्यावर विद्यार्थ्यांचे लसीकरण करुनच शाळा सुरु करणे उचित होईल. म्हणून ही गंभिर परिस्थिती विचारात घेऊन शाळा सुरु करण्याबाबत फेरविचार करावा अशीही मागणी श्री परजणे यांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.
Comments
Post a Comment