वारंवार भेटी घेउन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करावी : साहेबराव रोहोम
कोपरगाव (प्रतिनिधी) : कोरोना महामारीचे संकट आणि नैसर्गिक आपत्तीने हवालदिल झालेला बळीराजा सातत्याने आर्थीक चटके सहन करत आहे, अशा परिस्तिथीत शेतकऱ्याला सांत्वनाची नाही तर आर्थीक मदतीची गरज आहे, वारंवार भेटी घेउन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी केली आहे.
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे कोपरगाव विधानसभा मतदार संघातील विविध गावांमध्ये मोठया प्रमाणात नुकसान झाले. वादळी पावसाची तीव्रता प्रचंड असल्याने नागरीकांची घरे पडली, काही घरांची पत्रे उडाली. अनेक नागरीक बेघर झाली. फळबागांचे मोठे नुकसान झाले.शेतात असलेली उभ्या पिकांना या अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला. उसाची पिके भुईसपाट झाल्याने शेतकरी चिंतातूर आहे. कोरोना महामारीच्या संकटामुळे आर्थीक घडी विस्कटलेली असतांना पदरमोड करून शेतीमध्ये पीके उभी केली. वारंवार येणा-या नैसर्गिक आपत्तीमुळे हातात येणारी पिके वाया गेल्याने शेतकरी आर्थीक विवंचनेत सापडलेला आहे. चोहोबाजुने आलेल्या या संकटामुळे बळीराजा आर्थीक झळ सहन करत आहे, सातत्याने येणा-या संकटामुळे शेतकरी बांधव हवालदिल झालेला असतांना त्यांना आर्थिक मदत करण्याऐवजी केवळ भेटी दिल्या जात आहे.मात्र त्यांच्या पदरात काही पडत नाही. त्यामुळे आता वारंवार भेटी देउन शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा त्यांना तातडीने आर्थीक मदत करण्यात यावी, अशी मागणी श्री रोहोम यांनी केली आहे.
Comments
Post a Comment