श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा
कोपरगांवपासून 23 कि.मी. वर अहमदनगर जिल्ह्याच्या (पूर्वीच्या कोपरगांव तालुक्यातील व आताच्या) राहता तालुक्यातील पुणतांबा गावाला हजारो वर्षांची धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक परंपरा आहे. ही राजा विक्रमादित्याची राजधानी होती. गावाचे नाव पुण्यस्तंभ अथवा ताम्रनगरी असे होते. एक रात्रीत तांब्याची बनवलेली नगरी म्हणूनही या गावाला ताम्रनागरी म्हणत असावे. गाव गोदातीरी वसले असून पुणतांबा गावाला दक्षिणकाशी पण म्हणतात. येथेच नदी काठी यज्ञसेनी देवीचे मंदिर आहे.श्री यज्ञसेनी देवी माता ही परिसरातील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे.
देवीची आख्यायिका :
शके १६८१ पूर्व काळामध्ये हरिशचन्द्र राजा येथे राज्य करीत होता, त्याच्या मुलास 'जलोदर' नावाचा आजार झाला. अनेक वैद्यांना दाखवूनही आजार बरा झाला नाही. राजास एका रात्री स्वप्न पडले राज्याच्या पश्चिमेला गोदावरी नदी काठी यज्ञ करून त्या यज्ञात १२ वर्षाच्या आतील लहान मुलाचा बळी दिल्यास रोग बरा होईल. राजाने राज्यात दवंडी पिटवली जो कोणी ब्राह्मण आपल्या मुलाला राज्याकडे देईल त्याला मुलाच्या वजनाइतके सोने दान करण्यात येईल. राज्याच्या जवळ पुरणगावात गोऱ्हे आडनावाचे गरीब ब्राह्मण कुटुंब राहत होते.त्यांना ५ मुले होती. राजाची दवंडी त्या गरीब ब्राहणाच्या मुद्गल नावाच्या लहान मुलाने ऐकली त्याने विचार केला माझ्या मरणाने जर संपूर्ण कुटुंबाचे कल्याण होत असेल तर मी बळी जाण्यास तयार आहे. त्यांनी बळी देण्याचे ठरवले व तशी वार्ता राजाला कळवण्यात आली. हे ऐकून राजाला हर्षानंद झाला.राजाने लगेच त्याच्या वजनाइतके सोने गोऱ्हे कुटुंबाला देऊन मुद्गलची संपूर्ण राज्यातून मिरवणूक काढण्यात आली व मुद्गलास बळी देण्यासाठी यज्ञ कुंडा जवळ बसवण्यात आले.मुद्गलची पूजा करून त्यास बळी देण्यासाठी यज्ञात टाकताच यज्ञातून देवी प्रकट झाली व तिने मुद्गल यास वरचेवर झेलले आणि त्यास यज्ञकुडा बाहेर सोडले. यज्ञातून निघाली म्हणून यज्ञसेनी देवी नावाने प्रसिद्ध झाली. श्री यज्ञसेनी देवी मातेचं मंदिर गावाच्या पश्चिमेला गोदावरी नदी तीरी शेकडो वर्षांपासून भव्य अश्या स्वरूपात उभे आहे. मुद्गल याने देवीची खूप वर्ष सेवा केली त्या दरम्यान मुद्गलपूरान नावाचा ग्रंथही त्याने लिहिला व देवी मंदिराशेजारीच त्याने समाधी घेतली.
यज्ञसेनी देवी मातेच्या गाभार्याच्या भिंतीवर प्राकृत भाषेत दगडावर कोरलेला ४०० वर्षे पुरातन शिलालेख पुढील प्रमाणे आहे- "शके १६८१ पार्थिव नाम संवत्सरे श्रावण शुद्ध पंचमी दिनी श्री आंबेचे देवालय पुरातन होते जीर्ण झाले आंबेच्या चित्तास आले म्हणून नूतन केले आण्णाजी सूत शिवाजी तस्ततनये हरबाजी बिडवाई यांनी निर्मिले".
पुणतांबा येथेच श्री खंडोबा यांनी बानुकडे चांदनापुरी जाताना नदीत फेकलेली त्यांची अस्सल तलवार आजही तेथे खड्गधारी खंडोबा मंदिरात पाहायला मिळते. ती कथा जय मल्हार टीव्ही मालिकेत आहे.
तसेच 1400 वर्षें जगलेल्या महायोगी चांगदेव महाराजांची संजीवन समाधी येथेच आहे. त्यांना विद्वत्तेचा व तपसामर्थ्याचा गर्व झाल्याने ते ज्ञानेश्वर माऊलींच्या भेटीस वाघावर गेले व तेथे गर्वहरण होऊन परतले. ती कथा प्रसिद्ध आहे. तपःश्चर्या केल्यानंतर माघ वद्य ३ शके १२९८ रोजी पुणतांबा येथे त्यांनी संजीवन समाधी घेतली.
अशा या पुणतांबा गावाला पुरातन पूर्ण तटबंदी असून गावाला अकरा वेशी आहेत.बऱ्याच ठिकाणी तटबंदी ढासळली आहे.नदीकाठी अहिल्याबाई होळकर व शिवराम धुमाळ यांनी बांधलेले घाट आहे. गावात कार्तिकस्वामी, मामाभाच्याचे मंदिर(याला ही एक पौराणीक कथा आहे), सोळा मारुती मंदिरे, सहा महादेव मंदिरे, तीन विठ्ठल मंदिरे, दोन दत्त मंदिरे व एक लक्ष्मी-नारायण मंदिर, भैरवनाथ मंदिर, राममंदिर, चांगदेव महाराज मंदिर अशी बरीच पुरातन मंदिरे आहेत.
या गावाचे आणखीन वैशिष्टय म्हणजे दिवंगत संगीतकार सी.रामचंद्र, स्व.माजी खा.सूर्यभान वहाडणे, स्व.जगन्नाथ बारहाते, बाबुराव चतुर्भुज हे दोन माजी आमदार या गावचे. महाराष्ट्रातील शेतकरी संपावर गेले ते याच गावातून..
|| जय श्री यज्ञसेनी माता ||
Comments
Post a Comment