राज्य शासन खंबीरपणे शेतकर्‍यांच्या पाठिशी : पालकमंत्री हसन मुश्रीफ


अहमदनगर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतपीकांचे पंचनामे येत्या आठ दिवसात पूर्ण करुन त्याचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविला जाईल. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना निश्चितपणे राज्य शासन दिलासा देईल. शेतकर्‍यांची दिवाळी गोड होईल, यासाठी प्रयत्न करु, असा विश्वास राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांनी दिला. आज त्यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील विविध गावांत जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पीकांची पाहणी केली,. त्यावेळी नुकसानीची माहिती सांगणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देत राज्य शासन खंबीरपणे तुमच्या पाठिशी असल्याचा शब्द त्यांनी दिला. यावेळी अतिशय आस्थेवाईकपणे संवाद साधत चौकशी करणार्‍या मंत्रीमहोदयांना पाहून शेतकर्‍यांनीही त्यांच्या संवादास प्रतिसाद दिला.

आज पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यातील करंजी, निपाणीजळगाव, फुंदे टाकळी, येळी, मुंगुसवाडे, आंतरवली, गोळेगाव, बोधेगाव, चापडगाव, करंजी आदी विविध गावातील भागाची पाहणी केली. तेथील शेतकरी वर्गाशी थेट शेतात जाऊन संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,  जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप यांच्यासह उपविभागीय अधिकारी देवदत्त केकाण तसेच दोन्ही तालुक्यांचे तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे अतिवृष्टी आणि कोरोना परिस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, महानगरपालिका आयुक्त श्रीकांत मायकलवार, अपर जिल्हाधिकारी पी. एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे आदी यावेळी उपस्थित होते. त्यानंतर श्री. मुश्रीफ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी  पालकमंत्री जाणार असलेल्या मार्गावर काही शेतकरी थांबले होते. त्यांना पाहताच पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी वाहनांचा ताफा थांबवला. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनी त्यांना नुकसान झालेली पीके दाखवली आणि राज्य शासनाकडून मदतीची अपेक्षा तीव्रतेने व्यक्त केली. पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी तितक्याच संयतपणे आणि संवेदनशीलतेने त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि शेतकर्‍यांची काळजी या सरकारला आहे, लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करुन तुम्हाला मदत निश्चितपणे मिळेल. तुमची दिवाळी गोड होईल, असा शब्द दिला. त्यांच्या या दिलाशाचे या शेतकर्‍यांनीही उत्स्फूर्त स्वागत करुन साहेब, तुम्हीच हे करु शकता अशी प्रतिक्रिया दिली.

मुंगुसवाडे येथील हंगे कुटुंबातील दोन महिला पाण्यात बुडून मृत्यू पावल्या होत्या. त्या कुटुंबाचे सांत्वन पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी केले आणि त्यांना आधार देत तालुका प्रशासनाला मदतीसाठीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.

आपल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी करताना श्री. मुश्रीफ यांना शेतकर्‍यांनी कापूस, मूग आदी पिकांचे खूपच नुकसान झाल्याचे आणि अजूनही पीके पाण्याखाली असल्याचे सांगितले. त्यावर थेट बांधावर जात तसेच अगदी शेतात जात त्यांनी शेतकर्‍यांकडून परिस्थिती जाणून घेतली.

पाहणी दौरा आटोपल्यानंतर पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रशासकीय अधिकार्‍यांसोबत जिल्हाधिकारी कार्यालय येथे आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी आठ दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी, ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्याठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ लावून हे काम वेळेत पूर्ण करुन अहवाल राज्य शासनाला सादर करु, असे सांगितले.

पावसामुळे अनेक ठिकाणी वीजेचे डीपी नादुरुस्त झाले आहेत. त्यांची तातडीने दुरु्स्ती करण्याच्या सूचना त्यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिल्या. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्याचे ते म्हणाले.

कोरोना प्रादुर्भाव घटलाय मात्र गाफील राहू नका

जिल्ह्यात गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांचे प्रमाण सातत्याने घटले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा अधिक झाले आहे. ही चांगली बाब असली तरी अद्यापपर्यंत कोरोनावर लस उपलब्ध झालेली नाही. एकीकडे आपण मिशन बिगीन अगेन अंतर्गत विविध बाबींना सुरु करण्यास परवानगी दिली आहे. सर्व व्यवहार सुरळीत होत आहेत. मात्र, त्यामुळे निष्काळजीपणा वाढणार नाही आणि प्रादुर्भाव वाढणार नाही, याची दक्षता प्रत्येकाने घेतली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन पालकमंत्री मुश्रीफ यांनी यावेळी केले.

रुग्ण संख्या घटल्यामुळे आता कोविड केअर सेंटरचा उपयोग पोस्ट कोविड केअर सेंटर म्हणून केला जाणार आहे. कोरोना झाल्यानंतर रुग्णांना काही त्रास जाणवत असेल तर त्यांना या सेंटरमध्ये उपचार केले जातील. यानंतर कोरोनाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता जगभरातील तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सर्व जिल्हावासियांनी स्वताची आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे, असे ते म्हणाले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा दुसरा टप्पा सुरु झाला आहे. या मोहिमेत आपण प्रत्येक कुटुंबांना भेटी देऊन त्यांची आरोग्यविषयक माहिती गोळा केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुटुंबातील जे सदस्य ज्येष्ठ नागरिक असतील, त्यांच्या प्रकृतीविषयी काही तक्रारी असतील, त्यांना उपचाराची गरज असेल यासंदर्भात पंचायत समिती स्तरावर कक्ष स्थापन करुन दूरध्वनीद्वारे याची माहिती घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

कोरोनावर लस लवकरच येईल, अशी आशा आहे. त्यादृष्टीने लसीकरण मोहिम कशापद्धतीने राबवावी, यासाठी आरोग्य कर्मचारी यांचा डाटाबेस तयार करण्याच्या सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. त्याची तयारी जिल्हा प्रशासनाने सुरु केल्याची माहिती पालकमंत्री मुश्रीफ यांनी दिली. 

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा