गोदावरी दूध संघ व बायफ संस्थेच्या कामधेनू' योजनेचा शुभारंभ
कोपरगांव (प्रतिनिधी) : कोरोना व अतिवृष्टीमुळे पशुपालकांच्या झालेल्या आर्थिक नुकसानीची दखल घेवून गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघ व बायफ मित्र संस्थेच्या संयुक्त सहकार्याने कामधेनू योजना सुरु करण्यात येणार असून या योजनेचा शुभारंभ शनिवार दि. ३१ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता संघाच्या सभागृहात करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी दिली.
कामधेनू योजनेअंतर्गत प्रामुख्याने सॉर्टेड सिमेन ( कृत्रिम रेतन ) कमी दरात उपलब्ध करुन देणे, पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी नोंदणी करणे, नोंदणीकृत पशुपालकांना अनुदानावर ९० टक्के कालवडींची हमी असणारे सॉर्टेड सिमेन उपलब्ध करुन देणे, जनावरांच्या आहारामध्ये अत्यावश्यक असलेल्या बायफ संस्थेच्या गुणवत्तापूर्ण खनिज मिश्रणाचा पुरवठा करणे, पशुरोग निदान प्रयोगशाळेमध्ये जनावरांचे रक्त, लघवी, दूध, शेण व इतर तपासण्यांचे दर कमी करणे अशा विविध उपक्रमांचा समावेश असून या योजनेचा शुभारंभ शनिवारी करण्यात येणार आहे. याप्रसंगी बायफचे राज्य विभागीय संचालक डॉ. व्ही. बी. दयासा, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुनील तुंबारे, बायफचे मुख्य कार्यक्रम समन्वयक डॉ. सुधीर वागळे, नाशिक कार्यालयाच्या अधिकारी नीधी परमार, कोपरगांव कार्यालयाचे विभागीय अधिकारी डॉ. बाळासाहेब जिगलेकर, राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे कार्यक्रम समन्वयक डॉ. चंद्रकांत धंदर, कोपरगांव पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. दिलीप दहे, संघाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत गाढवे आदी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. पशुपालकांनी व शेतकरी बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही परजणे यांनी केले.
Comments
Post a Comment