कोपरगाव नगरपरिषद पुन्हा भ्रष्ट कोल्हे गटाच्या कब्जात जाऊ नये म्हणून जनतेने मला विधानसभेत पाठविले नाही : विजय वहाडणे
कोपरगाव (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेला कौल मला मान्य आहे. मला कमी मते पडली, पराभव झाला तरी मी प्रत्येक प्रभागात राजकारण न करता विकासकामे करत आहे करणार आहे. लोकप्रिय ताईंच्या अतिलोकप्रिय पुत्राने आधी सांगावे, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत तुम्हाला असलेले तीस हजारांचे मताधिक्य कुठे गेले? शेकडो कोटी रुपये निधी आणल्याचे सांगता, पण कुणाला किती कोटी रुपये कमिशन मिळाले हे का सांगत नाही. छातीठोकपणे सांगतो कि मी नगराध्यक्ष व्हायच्या आधी 10 वर्षात झाली नाहीत इतकी कामे मी नगराध्यक्ष झाल्यापासून साडेतीन वर्षात केलेली आहेत. शहराच्या प्रत्येक प्रभागातील नगरसेवक व जनतेला ती कामे माहिती आहेत.
तुम्ही आमदार असतांना मी नगराध्यक्ष झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेला तुम्ही निधी मिळू दिलेला नाही, कारभारात अडथळे आणले, 5 नंबर साठवण तलाव व्हावा म्हणून मी दिल्लीपासून प्रयत्न करत होतो, पण तुम्ही अडथळेच आणले म्हणून जनतेने तुम्हाला घरी बसवले हे ध्यानात घ्या. नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत अनेकदा अडथळे तुम्हीच आणले. कोपरगाचे हक्काचे क्रीडासंकुल पळविणारेच विचारतात क्रीडांगणासाठीची राखीव जागा घ्यायचा प्रयत्न का केला नाही. नगरपरिषदेची आर्थिक कुवत नसतांना शहरात अजूनही असलेल्या अनेक आरक्षित जागा घ्यायचे ठरवले तर किती कोटी रुपये लागतील याचे भान आहे का. एकीकडे नगरपरिषदेला निधी मिळू द्यायचा नाही, पण दुसरीकडे माझ्याविरुद्ध बातम्या पेरायच्या हे उद्योग बंद करा. नविन पाणी पुरवठा योजनेवर देखरेख करणाऱ्या संस्थेला तुम्हीच हाकलून लावले, त्याच निसर्ग कॅन्सल्टन्सी संस्थेने आता वसुलीसाठी नगरपरिषदेवर दावा ठोकला आहे. निकाल विरोधात गेला तर होणारे प्रचंड आर्थिक नुकसानीला जबाबदार कोण? तुमच्यापैकी कुणी किती पैसे त्या योजनेच्या ठेकेदाराकडून उकळले याचा शोध घ्या. मेन लाईनवर नळजोड घेऊन प्रचंड पाणी वापरणारे पाणीचोर तुमच्याच भोवती आहेत. नेत्यांत धमक असेल तर त्यांनी त्यांच्याच चेल्याना मेन लाईनवरील त्यांचे नळजोड स्वतःहून तोडण्याचे आदेश द्यावेत. नगरपरिषदेने तसे करायचे ठरविल्यास शहरातील अनेक रस्त्यांची तोडफोड करावी लागेल.
सर्वसाधारण सभा किती झाल्या याचा हिशोब ठेवण्यापेक्षा शहरात झालेल्या विकासकामांचा हिशोब करा. तुमच्या गटाच्या ताब्यात सत्ता असतांना तुम्ही करून ठेवलेले घोळ निस्तारण्यातच अधिकारी कर्मचाऱ्यांचा वेळ जात आहे. नगरसेवकांना पुढे करून दररोज काहींना माहिती मिळविण्यासाठी अर्ज करून तुम्ही नाहक वेळ घेता आहात. तुमचे काही नगरसेवक ठेकेदारांना दमबाजी करून काही कामात भागीदार आहेत. त्या कामांचे बिल द्या असे मला आजही सांगताहेत. शहरातील (1) हेम मेडिकल ते एस. जी.विद्यालय रस्ता (2) धारणगाव रस्ता (3) गुरुद्वारा रोड (4) छ. संभाजी महाराज चौक ते इंदिरा पथ (5) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पूर्णाकृती पुतळा (6)खोका शॉप इ. कामे लवकरच पूर्णत्वास जाणार आहेत. त्यावर कार्यवाही सुरू असतांना मिटिंग ऐकूच येत नाही असे कारण देऊन अडथळे कोण आणतात जनतेला माहित आहे.
डॉ.आंबेडकर मैदानाचे व अनेक रस्त्याच्या कामाचे कार्यदेश दिलेले आहेत. पावसाळ्यामुळे कामे थांबलेली आहेत. तुमच्याच जवळचे अनेक ठेकेदार आहेत, त्यांना विचारा शहरात किती कामे झाली. अनेक वर्षे नगरपरिषद ताब्यात असतांना काही करायचे नाही व सत्ता हातातून गेल्यावर बोंब मारायची हे डावपेच बंद करा. नगरपरिषदेत नागरिकांना सन्मानाची वागणूक मिळते. कोपरगाव नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर वेस्ट झोन मध्ये 18 वा नंबर आला हे दिसत नाही का. तुमच्या काळात साठवण तलावातील मासे पकडण्याचा ठेका वार्षिक फक्त 1 लाख 6 हजार रुपयांना दिला होता, आता मी तोच ठेका वार्षिक 14 लाख 14 हजार रुपयांना दिला. कमी पैशात मासे पकडण्याचा ठेका देऊन 5 वर्षात नगरपरिषदेचे किमान 60 लाख रुपये उत्पन्न तुमच्याच काळात बुडाले, कुणाच्या खिशात किती गेले याचा राजपुत्राने आधी शोध घ्यावा. पाकिटवाले-टाळ्या पिटणारे गोळा करून भाषणे ठोकून समाधान मिळवू नका. जेष्ठ नेते श्री.कोल्हे साहेबांचे मार्गदर्शन-सल्ला घेतला तर फार बरे होईल. बहुमताचा वापर करून खोका शॉप,रस्त्यांची कामे यात तुम्हीच अडथळे आणत आहात हे जनता जाणून आहे. शहरात खोका शॉप व्हावीत यासाठी तुम्ही काय दिवे लावले होते.
आम्ही खोका शॉपसाठी काय प्रयत्न करतोय याची माहिती न घेता आरोप करणाऱ्या बातम्या छापण्यात वेळ घालवू नका. नगरपरिषदेची आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही राजकिय खटपटी सुरू केलेल्या आहेत. चमचे-चेले पुढे करून निवडणुकीपर्यंत तुमचे चाळे वाढत जाणार आहेत. तुमच्या काही नगरसेवकांचे तुमच्याबद्दल खरे काय मत आहे हे जाणून घ्या. मी प्रसिद्धीसाठी दिवसरात्र कॅमेरे व चेले सोबत घेऊन मिरवत नाही. सर्व प्रभागात झालेली कामे जाऊन बघा, मग कळेल किती कामे झालेली आहेत-सुरू आहेत आणि किती प्रस्तावित आहेत.
निवडणुकीत जय पराजय होत असतो. या आधी सहकारातील कोट्यावधी रुपये उधळूनही मा.श्री.कोल्हे साहेब यांचा विधानपरिषद निवडणूक व श्री.बिपीनराव कोल्हे यांचा विधानसभा निवडणुकीत दोनदा व ताईंचा एकदा पराभव झालेलाच आहे. मी तर तुमच्या इतका महान नाही. तुमच्या कारखान्यावर 200 कोटी रू कर्ज/ तोटा ही कुणाच्या कर्तृत्वाची पावती आहे? कारखान्याला सप्लाय कोण करतय जरा सांगाल का?
Comments
Post a Comment