नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही
अहमदनगर : शनिवारवाडय़ासमोरच्या पटांगणात बटाटय़ाचा बाजार भरत असे. त्यामुळे तिथे असलेला मारुती झाला ‘बटाटय़ा मारुती’. तसेच सराफांची दुकाने असलेल्या ठिकाणचा झाला ‘सोन्या मारुती’. आजच्या केईएम हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे उंटांचा तळ असायचा. त्यामुळे तिथला मारुती झाला ‘उंटाडय़ा मारुती’, तर स्मशानाकडे जाणारी अंत्ययात्रा खांदापालट करण्यासाठी जिथे थांबायची, त्या ठिकाणचा मारुती झाला ‘विसावा मारुती’. ‘डुल्या मारुतीची’ कथा काही औरच! पानिपत इथे मराठी सैन्याची कत्तल झाली म्हणून तो थरथर कापत होता, डुलत होता. तो झाला ‘डुल्या मारुती’. याबद्दल अजून एक वेगळी आख्यायिका सांगितली जाते. दुसऱया बाजीराव पेशवे यांनी पुणे सोडावे का यासाठी म्हणे या मारुतीला कौल लावला आणि या मारुतीने मान डोलवून त्याला मान्यता दिली. म्हणून हा झाला डुल्या मारुती ! भिकारदास शेठजींच्या जागेत आला म्हणून ‘भिकारदास मारुती’, तर गुरुवार पेठेत मृतदेह समोर ठेवून रडायची प्रथा होती म्हणून ‘रडय़ा मारुती’ आणि याचसोबत सुरू होते चमत्कारिक नावांची परंपरा. गवत्या मारुती, दंगल्या मारुती, धनगरांची वस्ती असलेल्या ठिकाणचा ‘लेंडय़ा मारुती’, भांग्या मारुती, बंदिवान मारुती, हलवायांची दुकाने असलेला भाग आणि त्यामुळे मारुतीच्या गळ्यात रोज जिलब्यांची माळ घातली जायची म्हणून तो झाला ‘जिलब्या मारुती’, तल्लीन मारुती, झेंडय़ा मारुती, पत्र्या मारुती. आजच्या फरासखाना इथे पूर्वी चापेकर बंधूंनी मारुतीच्या साक्षीने गोफण क्लब सुरू केला आणि तो मारुती झाला ‘गोफण्या मारुती’. दक्षिणमुखी मारुती आणि गावकोस मारुती असे अनेक मारुती आपल्या खास नावांनी प्रसिद्ध आहेत.
मारुतीबरोबरच इतरही देवस्थानांना असलेली चमत्कारिक नावे आपल्याला पुण्यात पाहायला मिळतात. एक आहे ‘दाढीवाला दत्त’! खरे तर दत्ताचा आणि दाढीचा इथे काहीच संबंध नाही. नारायण पेठेत दत्तात्रय घाणेकर यांनी १९११ मध्ये बाळप्पा महाराजांच्या प्रेरणेने एक दत्तमंदिर बांधले. त्याचे मूळ नाव श्रीपाद मंदिर, पण दत्तात्रय घाणेकरांना दाढी होती. त्यामुळे पुणेकरांनी या दत्ताचे नामकरण केले दाढीवाला दत्त. विजय टॉकीजजवळ आहे ‘सोटय़ा म्हसोबा’. म्हसोबा ही रक्षक देवता आहे. या देवाला नवस बोलत असत आणि तो पूर्ण झाला की, त्याला लाकडी सोटा वाहायची पद्धत होती. कदाचित रक्षक म्हणून त्याच्या हातात सोटा हवा ही भावना असू शकेल. या मंदिराच्या छताला हे भक्तांनी वाहिलेले सोटे टांगून ठेवत असत.
अजून एक वेगळे नाव असलेले मंदिर म्हणजे ‘उपाशी विठोबा’. इथे मात्र प्रथा काहीशी निराळी आणि भक्तिपूर्ण अशी आहे. जवळ जवळ तीन पिढय़ांच्या उपासाच्या व्रतामुळे या देवाला हे नाव पडले आहे. पेशवाईत गिरमे सराफांनी हे मंदिर बांधले. गिरमे उपास करताना लाह्यांचे पीठ आणि ताक असे एकत्र करून त्याचे सेवन करीत असत. त्यामुळे या विठोबाला ‘ताकपिठय़ा विठोबा’ असेही नाव पडले होते. पुढे गिरमे यांनी आपले उपासाचे व्रत नाना गोडबोले यांना सुपूर्त केले. नानांनी हे उपासाचे व्रत अंगिकारले आणि या विठ्ठलाची सेवा करू लागले. नाना गोडबोले हे उत्तम कीर्तनकार होते. पुढे त्यांनी आपल्या कीर्तन संचातील गंगाधरबुवा काळे यांच्याकडे आपले व्रत आणि हे मंदिर सुपूर्त केले. काळ्यांनी त्याच भक्तिभावाने हे व्रत अंगिकारले. सध्या साठे कुटुंबीयांकडे या मंदिराची व्यवस्था आहे. तीन पिढय़ांनी अंगिकारलेल्या उपासाच्या व्रतामुळे हा विठोबा मात्र ‘उपाशी विठोबा’ म्हणून प्रसिद्धीस पावला. असाच अजून एक विठोबा पुण्यात आहे तो म्हणजे ‘निवडुंग्या विठोबा’. नाना पेठेत असलेले मंदिर. वारीच्या वेळी संत तुकोबारायांची पालखी या मंदिरात उतरते. एका भक्ताला निवडुंगाच्या फडात ही मूर्ती मिळाली. पुढे गोसावींनी इथे मंदिर बांधले आणि तो झाला ‘निवडुंग्या विठोबा’. ज्ञानेश्वर माऊलींची पालखी उतरते तो आहे ‘पालखी विठोबा’. तद्वत पासोडय़ांचा बाजार जिथे भरायचा, तिथे आधी मंदिर झाले पासोडय़ा मारुतीचे आणि त्याच्या नंतर त्याच्या जवळ मंदिर झाले ते ‘पासोडय़ा विठोबाचे’. याशिवाय चोळखण आळीत असलेला ‘खणाळ्या म्हसोबा, नागाचे स्वतंत्र मंदिर आणि त्यात विराजमान असलेली दगडात कोरलेली नागाची जोडी म्हणून तो झाला ‘दगडी नागोबा’.
यांच्यात भर घालायला आलेली देवळे म्हणजे ‘गुडघेमोडी माता’, ‘शितळादेवी’, ‘भाजीराम मंदिर’, मातीपासून केलेला ‘माती गणपती’, ‘गुपचूप गणपती’, पेशवाईत नाना फडणवीसांचा सहकारी असलेल्या नागोजी गुंड याच्या घराजवळ असलेला गणपती झाला ‘गुंडाचा गणपती’. अजून दोन नावे अशीच आगळीवेगळी आहेत. एक आहे ‘बीजवर विष्णू’. खरे तर विष्णूचे एकच लग्न झालेले आहे ते लक्ष्मीशी. मग पुण्यात बीजवर विष्णू कसा काय आला? तर झाले असे की, विष्णू आणि लक्ष्मीच्या मूर्तींपैकी लक्ष्मीची मूर्ती भग्न झाली. तिच्या जागी दुसरी मूर्ती आणून वसवली म्हणून हा देव झाला बीजवर विष्णू ! आणखी एक देवस्थान म्हणजे ‘खुन्या मुरलीधर’. सन १७९७ मध्ये गद्रे सावकारांनी हे मंदिर बांधले आणि त्याच्या रक्षणासाठी अरब शिपाई ठेवले. त्यांच्यात आणि इंग्रजी सैन्यात इथे लढाई झाली. त्यात ६० लोक मारले गेले. दुसरे असे की, चापेकर बंधूंनी रँड या ब्रिटिश अधिकाऱयाचा खून केला. त्यांच्या कटात आधी सामील असलेले द्रविड बंधू नंतर फितूर झाले आणि त्यांनी पोलिसांना सगळी माहिती दिली. हे द्रविड या मुरलीधर मंदिरासमोरच राहायचे. फितुरीची बातमी कळल्यावर या द्रविड बंधूंचा इथेच खून करण्यात आला. त्यामुळे हा मुरलीधर झाला ‘खुन्या मुरलीधर’.
अशी अजूनही अनेक नावे आणि देवळे पुण्यात पाहायला मिळतील. नावे ठेवण्यात पुणेकरांचा हात कोणीही धरणार नाही. तीन सोंडी असलेला म्हणून त्रिशुंड गणपती इथपर्यंत ठीक आहे, पण पुणेकरांनी आपल्या देवतांना आणि त्यांच्या मंदिरांना एकापेक्षा एक भन्नाट नावे ठेवलेली आढळतात. खरे तर ही नावे अत्यंत सोपी आणि सुटसुटीत अशीच ठेवलेली आहेत. या नावांतून त्या त्या ठिकाणांच्या इतिहासाचा सहज उलगडा होतो. तिथे असलेला बाजार, वस्ती, तिथे घडलेल्या घटना यांचा या देवांशी संबंध लावून दिल्यामुळे पुण्याच्या इतिहासाचा मागोवा घेताना ही नावे खूप उपयुक्त ठरतात. *‘‘नावात काय आहे?’’ असे कोणीतरी म्हटले होते, परंतु ‘‘नावातच सर्व इतिहास दडलेला आहे’’ असे ठामपणे फक्त पुणेकरच सांगू शकतात!*
Comments
Post a Comment