श्री साईबाबा संस्थान शिर्डीचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांचे निधन
कोपरगाव (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे देवस्थान श्री साईबाबा संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन जगन्नाथ यादव वय 55 यांचे नाशिक येथील अपोलो रुग्णालयात मेंदूत रक्तस्राव झाल्याने निधन झाले, कोविड झाल्याने त्यांच्यावर तेथे उपचार सुरू होते त्यांच्या मागे पत्नी सुरेखा, एक मुलगा यश, एक मुलगी श्रद्धा, असा परिवार आहे. शिर्डीचे साई बाबांच्या माध्यमातून त्यांचा अल्पावधीतच जगाशी संपर्क आला होता. गणमान्य व्यक्तींच्या संपर्कात ते आले होते माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी ग्रुप इन्स्टीट्युटमध्ये त्यांनी ग्रंथपाल, सचिव म्हणून अनेक वर्षे काम केले. दैनिक लोकसत्ता या वृत्तपत्राचे कोपरगाव वार्ताहर म्हणून त्यांनी पाच वर्षे काम केले पाहिले. त्यांच्या निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली. अत्यंत सरळ, शून्यातून प्रगती साधणारे, नेहमी हसतमुख, आणि कायम परोपकारी वृत्तीचे मोहन यादव सर अचानकपणे अनंताच्या प्रवासाला निघून गेल्याने चटका लावणारी घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वल्हे वाडी वावी हे त्यांचे मूळ गाव. घरची परिस्थिती अत्यंत बेताची. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कमवा आणि शिका योजनेतून त्यांनी एस जी एम कॉलेज कोपरगाव येथून शिक्षण पूर्ण करत ग्रंथपाल कोर्स उत्तीर्ण केला. त्यानंतर ते संजीवनी सांस्कृतिक मंडळ सहजानंदनगर येथे काम पाहू लागले. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूट या शिक्षण संस्थेत ग्रंथपालपदी त्यानंतर ते रुजू झाले. सैन्यदल भरती पूर्व प्रशिक्षण संस्था संजीवनी क्रिकेट ट्रेनिंग सेंटरला मदत मिळवून देण्यासाठी त्यांनी काम केले. दैनिक लोकसत्ता अहमदनगर आवृत्तीचे कोपरगाव वार्ताहर म्हणूनही त्यांनी यशस्वीपणे जबाबदारी सांभाळली होती. अनेक जणांना त्यांनी मदतीचा हात दिला स्वतः प्रत्येकाच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होत असत यशाची एक एक शिखरे त्त्यानी अत्यंत नम्रपणे हाताळली, त्यामुळेच ते संजीवनी ग्रुप इन्स्टिट्यूटमध्ये सचिव झाले. त्यानंतर ते साईबाबा संस्थान शिर्डी येथे ग्रंथपाल पदी रुजू झाले. त्यातून त्यांची साईबाबा संस्थान शिर्डीचे जनसंपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. गेल्या पंधरा वर्षांपासून ते या पदाची धुरा सांभाळत होते भारत देशा संपूर्ण जगभर साईबाबांच्या प्रसिद्धीचे काम त्यांनी अत्यंत नेटाने सांभाळले. साईबाबा शताब्दी सोहळ्यातही त्यांनी जबाबदारीने काम करत त्यासाठीचे सर्व प्रकल्प शासकीय निम शासकीय स्तरावर मार्गी लावण्यासाठी मोठा पाठपुरावा केला. आंतरराष्ट्रीय देवस्थान शिर्डी मुळे त्यांचा जनमानसातील अत्यंत छोट्यातल्या छोट्या सह अतिउच्च व्यक्तींपर्यंत संपर्क आला पण त्याचा लवलेशही त्यांच्या चेहर्यावर कधी जाणवला नाही. त्यांनी साईबाबावर लिहिलेले पुस्तक 14 भाषेत प्रसिद्ध झाले. विविध वृत्तपत्रातून त्यांचे साई बाबांच्या जीवनावर लेख माला ही प्रसिद्ध झाल्या होत्या प्रत्येक व्यक्तीशी ते नेहमीच हसून खेळून बोलत. त्यांची सुख दुःखे हलकी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या नम्र वागण्याने त्यांचा सर्वदूर जनसंपर्क होता. मनाने मोठा असलेल्या मोहन यादव सरांची अकाली एक्झिट मनाला धडकी भरवणारी ठरली त्यांच्या अकाली निधनाने साईंचा संपर्क काही काळासाठी निस्तब्ध झाला आहे.
Comments
Post a Comment