दूषित पाण्यातून मेंदू कुरतडणाऱ्या अमिबाने घेतला चिमुरड्याचा जीव


अमेरिका : Coronavirus ने थैमान घातलेलं असताना आता एकपेशीय प्राणी असलेल्या अमिबासुद्धा मनुष्याच्या शरीरास किती धोकादायक ठरू शकतो, हे अमेरिकेतल्या एका घटनेमुळे सिद्ध झालं आहे. दूषित पाण्यातून हा सूक्ष्म जीव सहा वर्षांच्या चिमुरड्याच्या शरीरात गेला आणि सरळ मेंदूवर हल्ला केला. मेंदू कुरतडणाऱ्या अमिबामुळे या मुलाचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तपासणी अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

अमेरिकेमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. टेक्सास प्रांतातील ब्राझोरिया काउंटीमध्ये एका लहान मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला. पाण्यातील अतिसूक्ष्म एकपेशीय जीव अमिबा मेंदूत जाऊन या मुलाचा मृत्यू झाल्याचं तपासात लक्षात आलं. त्यानंतर टेक्ससमध्ये आपत्कालीन परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. हा अमिबा पाण्यावाटे मुलाच्या शरीरात गेल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

8 सप्टेंबरला या मुलाचा मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला. जॉशिया मॅकिन्टायर असं या मुलाचं नाव आहे.  नेग्लेरिया फॉवलेरी नावाचा अमिबाच्या संसर्गाने त्याचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालं. हा अमिबा तलाव, नद्यांमध्ये पैदा होतो. स्वच्छ पाण्यात तो आला यामागे ढिसाळ व्यवस्थापन किंवा जलशुद्धीकरण यंत्रणा असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकेतील ढिसाळ व्यवस्थापन असलेल्या जलतरण तलावांच्या गरम आणि ताज्या पाण्यावर त्याची पैदास होत असल्याचं लक्षात आलं आहे.

हा अमिबा माणसाच्या श्वासोच्छवासातून नाकावाटे मेंदूपर्यंत पोहोचतो. त्यामुळे मायग्रेन, हायपरथर्मिया, मान आखडणं, उलट्या,  अत्यंत थकवा, भ्रमिष्टपणा यासारखे आजार होतात. 1983 ते 2010  या काळात या अमिबामुळे 28 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाचं म्हणजे या मुलाच्या घरातील नळाच्या पाण्याची तपासणी केली असता त्यामध्ये या अमिबाचा वावर असल्याचे अंश सापडले आहेत, अशी माहिती लेक जॅक्सन शहराच्या प्रवक्त्यांनी माध्यमांना दिली. जॉशियाच्या आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, स्प्लॅश पार्क नावाच्या डाउनटाऊनमधील वॉटर पार्कमध्ये खेळल्यानंतर तो आजारी पडला. त्यानंतर त्याला ही लक्षणं जाणवू लागली. त्याला  उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण 8 सप्टेंबरला त्याचा मृत्यू झाला.

ही घटना घडल्यानंतर राज्यातील सर्वांनी पाणी उकळून प्यावं असं  आवाहन प्रशासनानी केलं आहे. त्याचबरोबर नळाचं पाणी आणि साठवलेलं पाणी वापरण्यास देखील प्रतिबंध घालण्यात आले आहेत. टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अबॉट यांनी रविवारी ब्रेझोरिया काउंटीमध्ये आपत्कालीन परिस्थितीची घोषणा केली. त्याचबरोबर  आणिबाणीमुळे राज्यातील अतिरिक्त राखीव पाणीसाठा वापरण्यासही परवानगी देण्यात आली आहे.

पाण्यातून होणाऱ्या आजारांमुळे भारतातही अनेकांना प्राण गमवावे लागतात. त्यामुळे पाणी स्वच्छ गाळून, गरम करून पिण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो. अमिबामुळे लहान मुलाला प्राण गमवावे लागल्याचं वृत्त वाचल्यानंतर सर्वांनीच पाणी पिताना अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाकाळात आपण स्वच्छतेची काळजी घेत आहोत ती कायम घेणं गरजेचं असल्याचं पुन्हा एकदा दिसून आलं आहे.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा