झेप फाउंडेशनने टाळेबंदी व त्यानंतरच्या काळात केली 125000 जेवणांची व्यवस्था
फिरोदिया प्रशालेच्या 1992 च्या विद्यार्थ्यांनी केली होती सामाजिक उपक्रमाची सुरुवात
अहमदनगर : मार्च मध्ये करोना व्हायरसच्या साथीला रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर झाली आणि रोजंदारीवर काम करणारे मजूर आणि छोट्या व्यावसायिकांवर बेरोजगारीचं संकट कोसळलं. हे काम करणाऱ्या अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. नगरमधील भाऊसाहेब फिरोदिया प्रशालेच्या 1992च्या दहावीच्या वर्गातील मित्रमैत्रिणींनी आपली सामाजिक बांधिलकी ओळखून अशा परिस्थितीत मदत करण्याची कल्पना मांडली. याच वर्गात असणाऱ्या झेप फाउंडेशन या संस्थेचे रेश्मा सांबरे व प्रसाद झावरे आणि झावरे हॉस्पिटलचे संचालक डॉ. सागर झावरे यांनी या उपक्रमासाठी मदतीचे आवाहन केले. सुरुवातीला काही मित्र मैत्रिणींनी सुरू केलेल्या या उपक्रमाला अनेक दानशूर व्यक्तींनी हातभार लावला आणि पाहता पाहता एक मोठे सामाजिक कार्य उभे राहिले.
झेप फाउंडेशनने हाती घेतलेल्या या प्रकल्पात गेल्या चार महिन्यात तांदूळ, कणिक (आटा), गहू, डाळ, तेल, मसाला, भाजीपाला तसेच सुरक्षेसाठी मास्क इत्यादींचे वितरण समाजातील गरजू, उपेक्षित आणि पीडीत व्यक्तींना केले. स्थलांतरित कामगार, बेरोजगार, गरीब वसाहतीतील रहिवासी, तृतीयपंथी, अनाथ मुले, विधवा, आदिवासी तसेच वेश्यावस्तीतील मुले मुली इत्यादी समाजातील उपेक्षित घटक या प्रकल्पाचे लाभार्थी आहेत. समाजातील दुर्ब लातील दुर्बल घटकापर्यंत आपली मदत पोहोचवण्यासाठी संस्थेकडून सर्व्हे देखील करण्यात आला. आणि त्यानुसार गरजू व्यक्तींपर्यंत आपली मदत कशी पोहोचेल या दृष्टीने एक सक्षम नेटवर्क झेप फाऊंडेशन ने तयार केले आहे.
याच उपक्रम अंतर्गत आजपर्यंत सुमारे 1,25,000 जेवणांची गरज या प्रकल्पातून पुरवलेल्या सामग्रीमधून भागवली गेली. या प्रकल्पाचे कार्य अहमदनगर शहरातील मुकुंद नगर, फकीर वाडा, इंदिरा नगर, बजाज नगर, दातरंगे मळा, माळी वाडा, नालेगाव, कायनेटिक चौक, शनी चौक इत्यादी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील नांदगाव, कर्जत, जामखेड रस्ता आणि वडगाव गुप्ता ह्या भागांमध्ये धान्य पोहोचवण्याचे कार्य या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले.
नगर शहर बरोबरच पुणे शहरातील लोहगाव, वडगाव शेरी, जनता वसाहत, गुलटेकडी औद्योगिक वसाहत, कात्रज कोंढवा रस्त्यावरील वस्ती, बावधन गाव, विमान नगर मधील वसाहत, फुलगाव औद्योगिक वसाहत, कारेगाव औद्योगिक वसाहत, धानोरी, येरवडा, भवानी पेठ, हडपसर, सिंहगड पायथ्याशी असणाऱ्या गावांमध्येही धान्य पोहोचवण्याचे कार्य या प्रकल्पाअंतर्गत करण्यात आले.
अहमदनगर महानगरपालिका संचलित रोटरी कोविड केअर सेंटर येथे विनामूल्य जेवण पुरवणाऱ्या रोटरी कम्युनिटी किचन प्रोजेक्टसाठी धान्य पोहोचवण्यात आले आहे.
झेप फाउंडेशनच्या या कार्यात अनेक व्यक्ती आणि संस्थांनी हातभार लावला आहे. युवक क्रांती दल, अनेक सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते, नगरसेवक, अहमदनगर महानगर पालिका, एकला, जीवन संस्था, सोफिया व्ही संस्था, अग्रज फूड्स, महात्मा गांधी स्कुल तसेच रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मिड टाऊन ह्या सर्व संस्थांनी प्रत्येक धान्याचा कण गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचेल याची काळजी घेतली. शक्य तेवढ्या गरजू लोकांची किमान अन्नाची गरज भागावी संकल्प मनात घेऊन हा प्रकल्प हाती घेतला गेला. आठ दहा मित्रमैत्रिणींच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या एका छोट्या उपक्रमाचे रूपांतर मोठ्या प्रकल्पात झाले आणि लाखो जेवणांची गरज भागवण्यात आली. करोनाची साथ, टाळेबंदी व त्यामुळे झालेले मजुरांचे स्थलांतर या सगळ्याचा परिणाम होऊन बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. संस्थेकडे अजूनही अन्नधान्याच्या मदतीसाठी विचारणा होत आहे. आणि झेप फाउंडेशन ही गरज भागविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मदतीचे आवाहन केले आहे.
झेप फाउंडेशन या संस्थेची स्थापना अहमदनगर येथेच झालेली असून समाजातील उपेक्षीत घटकांना विशेषतः महिला व मुलींना व्यवसायोपयोगी शिक्षण देणे तसेच या घटकातील मुलांना शालेय शिक्षणासाठी मदत करणे हे या संस्थेचे प्रमुख उद्देश आहेत. प्रसाद झावरे व रेश्मा सांबरे यांच्याबरोबरच माधुरी देशपांडे या संस्थेच्या सहसंचालिका आहेत. या संस्थेने आर्थिक व सामाजिकदृष्ट्या उपेक्षित घटकांतील मुले ज्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत अशा काही शाळांमध्ये नाविन्यपूर्ण पद्धतीने इंग्लीश स्पिकिंग व डिजिटल लिटरसीचे काही प्रकल्प राबवण्यास सुरुवात केलेली आहे.
झेप फाउंडेशन अहमदनगर जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील काही बचत गटांना आपल्या कार्यात सहभागी करून घेत त्या बचतगटाच्या सभासदांसाठी व्यवसायिक कौशल्य, आर्थिक साक्षरता, घरगुती व्यवसाय तसेच महिला गृहउद्योगातून तयार केलेल्या खाद्य पदार्थांचे मार्केटिंग यासाठी प्रकल्प राबवित आहे.
सद्यस्थितीत शाळा बंद असल्याने इंटरनेट, फोन तसेच इतर माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये याचा प्रयत्न चालू आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असणारे स्मार्टफोन तसेच इतर साहित्य समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने मिळवून देण्यातही संस्था कार्यरत आहे.
झेप फाऊंडेशन ही सामाजिक संस्था मागील ५ महिन्यांपासून आपल्या शहरात कुठलाही समारंभ न करता सामाजिक जबाबदारी म्हणून काम करत आहे, अशी माहिती प्रसाद झावरे यांनी दिली.
Comments
Post a Comment