राष्ट्रवादीच्या आमदारांनी केला भाजपच्या नेत्यांचा सत्कार
वेब टीम : अहमदनगर
राज्यात जरी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विरोधक भाजपावर टीका केली असेल, परंतु अहमदनगर येथे राजकीय चित्र उलटे आहे.
भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणून अहमदनगरचे प्रा.भानुदास बेरड यांची निवड झाल्याने चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
या विरोधाभास असणाऱ्या घटनेमुळे अहमदनगर शहरात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, नगरात एक वेगळीच चर्चा रंगली आहे.
पण यापूर्वीही महापालिकेत राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर भाजपाचा महापौर झाला आहे, हेही विसरून चालणार नाही.
अहमदनगर माध्यमिक शिक्षक सोसायटीच्या वतीने घेण्यात आलेल्या छाट्याखानी कार्यक्रमानिमित्त आमदार संग्राम जगताप व भाजपचे प्रा. भानुदास बेरड हे एकत्र आले होते.
या दरम्यान, भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यसमिती सदस्य म्हणुन प्रा. बेरड यांची निवड झाल्याबद्दल सत्कार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी बाबासाहेब बोडखे, आप्पासाहेब शिंदे, महेंद्र हिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गणेश भोसले, मनपा विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, सुनिल थोरात आदि उपस्थित होते.
Comments
Post a Comment