गोल्ड लोनच्या कार्यालयावर दरोडा, १ कोटीचा ऐवज लंपास
पुणे : पुणे-नगर रोडवरील आयएफएल गोल्ड लोनच्या कार्यालयावर सोने तारण ठेवण्याच्या बहाण्याने बंदूकधारी चोरट्यांनी दरोडा टाकल्याची घटना गुरुवारी सकाळी पावणेअकरा वाजता घडली. भरदिवसा हा प्रकार घडल्यामुळे व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पंधरा दिवसांतील बंदुकीच्या धाकाने सोने लुटण्याची ही दुसरी घटना आहे. चोरट्यांनी एक कोटीपेक्षा अधिक किमतीचा ऐवज चोरी करून पोबारा केला आहे.
याप्रकरणी मनीषा नायर यांनी तीन अनाेळखी व्यक्तींविरोधात तक्रार दिली असून सुमारे १२० ग्राहकांचे साेने तारण ठेवलेली पाेस्टकार्ड साइजची पाकिटे आराेपींनी पळवून नेली आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह गुन्हे शाखेच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली आहे. अगदी चालत चोरट्यांनी घटनास्थळावरून पोबारा केला. चंदननगर भाजी मार्केट परिसरातील आनंद एम्पायर या इमारतीच्या ग्राउंड फ्लोअरला या कंपनीच्या गोल्ड लोनचे कार्यालय आहे. सकळी पावणेअकराच्या सुमारास एक व्यक्ती सोने तारण ठेवून गोल्ड लोण घेण्याच्या बहाण्याने कार्यालयात शिरला. त्यानंतर त्याच्यापाठोपाठ अन्य दोन व्यक्तीदेखील आत आल्या. सकाळीच कार्यालय उघडून दुकानातील दोन महिला व एक पुरुष काम करत होते. त्या वेळी सोन्याच्या तिजोऱ्यादेखील उघड्या होत्या. चोरट्यांनी कार्यालयातील एका कामगाराच्या डोक्याला बंदूक लावून तिजोरीतील सोन्याचे दागिने बॅगेत भरण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळात कोट्यवधी रुपयांचा ऐवज चोरी करून चोरट्यांनी पळ काढला. चंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास करत आहेत.
Comments
Post a Comment