इस्रायली तंत्रज्ञानाने व्हाॅट्सअॅपमध्ये घुसखोरी, भारतीय पत्रकारांसह १४०० जणांची हेरगिरी
वेब टीम
नवी दिल्ली - व्हाॅट्सअॅपला खिंडार पाडून जगभरातील पत्रकार व मानवाधिकार कार्यकर्त्यांची हेरगिरी केल्याचे खळबळजनक प्रकरण समोर आले असून यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हाॅट्सअॅपने स्पष्ट केले की, इस्रायली स्पायवेअर “पेगासस’च्या माध्यमातून चार उपखंडांतील सुमारे १४०० लोकांच्या फोनमध्ये घुसून राजकीय नेते, राजकीय असंतुष्ट, पत्रकार व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची हेरगिरी करण्यात आली. पेगासस हे स्पायवेअर देखरेख करणारी इस्रायली संस्था एनएसओने तयार केले. हे सर्व कारस्थान नेमक्या कुणाच्या सांगण्यावरून झाले, हे मात्र अद्याप स्पष्ट नाही. दरम्यान, भारतातील किती लोकांची हेरगिरी झाली तो आकडा देण्यास व्हाॅट्सअॅपने नकार दिला. कंपनीने म्हटले आहे की, मे महिन्यात मोठा सायबर हल्ला रोखण्यात आला होता. याच काळात भारतात लोकसभेची निवडणूक होती. यावर चिंता व्यक्त करून माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हाॅट्सअॅपकडून म्हणणे मागवले आहे.
व्हाॅट्सअॅपच्या भारतातील प्रवक्त्यानुसार, अशा युजर्सशी याच आठवड्यात संपर्क साधण्यात आला. भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींचे वकील निहालसिंह राठोड, सामाजिक कार्यकर्त्या बेला भाटिया, डिग्री प्रसाद चौहान, आनंद तेलतुंबडे आदींनी एका चॅनलला व्हाॅट्सअॅपकडून असा संदेश मिळाल्याचा दावा केला.
काँग्रेसचा केंद्रातील मोदी सरकारवर आरोप
काँग्रेसने मोदी सरकारवर हेरगिरीचा आरोप केला असून सुप्रीम कोर्टाने याची दखल घ्यावी, असे म्हटले आहे. सरकारमधील कोणत्या यंत्रणेने याचा वापर केला, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला.
नागरिकांच्या खासगी जीवनाच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध
माहिती-तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ट्विट करून म्हटले आहे की, नागरिकांच्या खासगी जीवनाच्या सुरक्षेबाबत सरकार कटिबद्ध आहे. युपीएच्या काळात तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जींच्या कार्यालयातही असा व्हायरस सापडला होता, हे आरोप करणाऱ्यांनी विसरून चालणार नाही.
Comments
Post a Comment