सेने'सोबत' किंवा 'शिवाय'... भाजपाचा मंत्रीमंडळ शपथविधीचा मुहूर्त ठरला
वेब टीम
मुंबई - विधानसभेच्या निकालानंतर सत्तास्थापनेचं गणित कोण जुळवून आणणार या प्रश्नावर भाजपानं आपल्या बाजुनंच उत्तर काढलंय. येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजपा मंत्रीमंडळाचा शपथविधी समारंभ पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिलीय. शिवसेना पुढे आली तर सोबत नाहीतर शिवसेनेशिवाय भाजपा एकट्यानंच शपथविधी करण्याच्या हालचाली सुरु झाल्यात. ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडावा, अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्र्यांसहीत काही ठराविक मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी दिली.
आमदार प्रसाद लाड आणि प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांच्याकडे मंत्रीमंडळ तयारीची जबाबदारी देण्यात आलीय. २०१४ प्रमाणेच सत्तास्थापन करण्याची तयारी भाजपानं केलेली दिसतेय. २०१४ साली मुख्यमंत्र्यांसह भाजपाच्या प्रमुख १० मंत्र्यांचा शपथविधी पार पडला होता. शिवसेना त्यानंतर दीड महिन्यांनी सरकारमध्ये सहभागी झाली होती. यावेळी शिवसेना आता बरोबर आली तर ठीक अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या काही प्रमुख मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याचं समजतंय.
सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या ५ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी शपथविधी समारंभ आयोजित करण्याचे निश्चित केले आहे. यावेळचा शपथविधी समारंभही भव्य दिव्य करण्याची तयारीही करण्यात येतेय.
Comments
Post a Comment