सिंधूची विजयी सलामी




वेब टीम
ओडेन्से (डेन्मार्क) - भारताच्या बी. साई प्रणीतने डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत चीनच्या लीन डॅनचे आव्हान परतवून लावले. त्याचबरोबर पी. व्ही. सिंधूनेही विजयी सलामी दिली, तर परुपल्ली कश्यप आणि सौरभ वर्माला मात्र पराभवाचा सामना करावा लागला.
पुरुष एकेरीच्या सलामीच्या लढतीत साई प्रणीतने लीन डॅनचे आव्हान २१-१४, २१-१७ असे परतवून लावले. ही लढत ३६ मिनिटे चालली. जागतिक क्रमवारीत साई प्रणीत १२व्या स्थानावर असून, लिन डॅन १८व्या स्थानावर आहे. ऑलिंपिक आणि वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या लिन डॅनने मागील दोन्ही लढतींत साई प्रणीतला नमविले होते. या वेळी मात्र साई प्रणीतने त्याच्यापेक्षा सरस खेळ केला. पहिल्या गेममध्ये सुरुवातीला दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. मात्र, 'ब्रेक'ला साई प्रणीतने ११-८ अशी आघाडी मिळवली होती. यानंतर मात्र साई प्रणीतने लिन डॅनपेक्षा दोन पाऊले पुढेच राहिला. साई प्रणीतने १८-१४ अशा आघाडीनंतर सलग तीन गुण घेत पहिली गेम जिंकली. दुसरी गेम अतिशय अटितटीची झाली. दोन्ही खेळाडूंनी एकमेकांविरुद्ध आघाडी घेण्याचा आटोकाट प्रयत्न केला. यात साई प्रणीतने नेटजवळ सुरेख खेळ केला, तर लिन डॅनचे काही 'बॉडी स्मॅशेस' जबरदस्त होते. 'ब्रेक'ला साई प्रणीतने ११-९ अशी आघाडी मिळवली होती. विश्रांतीनंतर ही गेम १२-१२, १६-१६ अशी बरोबरीत सुरू होती. यानंतर साई प्रणीतने दोन गुण घेत आघाडी मिळवली. पुढील गुण घेत लिन डॅनने त्याला गाठण्याचा प्रयत्न केला. मात्र, यानंतर साई प्रणीतने सलग तीन गुण घेत लिन डॅनला नमविले. दुसऱ्या फेरीतही साई प्रणीतची कसोटी लागणार आहे. त्याच्यासमोर आव्हान असेल ते अग्रमानांकित केंतो मोमोता आणि वांग विंग कि व्हिन्सेंट यांच्यातील विजेत्याचे.

दुसरीकडे, थायलंडच्या सिथिकोम थामसिनने कश्यपला २१-१३, २१-१२ असे ३८ मिनिटांत पराभूत केले. थामसिन जागतिक क्रमवारीत २७व्या, तर कश्यप २५व्या स्थानावर आहे. थामसिनचा हा कश्यपवरील सलग दुसरा विजय ठरला. यानंतर नेदरलँड्सच्या मार्क कालजोवने सौरभ वर्मावर १९-२१, २१-११, २१-१७ असा विजय मिळवला. ही लढत एक तास अन् १८ मिनिटे चालली. मागील दोन्ही लढतींत सौरभने मार्कला नमविले होते. मात्र, या वेळी पहिली गेम जिंकूनही सौरभला मार्कवर विजय मिळवता आला नाही. पुरुष दुहेरीत सात्त्विकसाईराज रांकिरेड्डी-चिराग शेट्टी जोडीने कोरियाच्या किम जि जुंग-ली यंग डा जोडीवर २४-२२, २१-११ असा विजय मिळवला.

Comments

Popular posts from this blog

धनगरी घोंगडीचे आरोग्य विषयक फायदे व धार्मिक महत्त्व!

*आपल्यातील "मी"बाजूला ठेवत आत्मचरित्र लिहणे ही तारेवरची कसरतच* - श्री आर एन जाधव..... श्री अशोक शेजुळ लिखित *कृपाछत्र* पुस्तकाचा विमोचन सोहळा......

श्री यज्ञसेनी देवी, पुणतांबा